सोमवारी वस्तरा बंद ठेवा
By Admin | Updated: December 15, 2014 01:07 IST2014-12-15T01:07:46+5:302014-12-15T01:07:46+5:30
मात्र बहुतेक परवानाधारक आणि अनधिकृत व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे सोमवारसह आठवड्याचे सातही दिवस सलून व ब्यूटीपार्लर सुरू ठेवत आहेत

सोमवारी वस्तरा बंद ठेवा
चेतन ननावरे, मुंबई
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सलून आणि ब्यूटीपार्लर सोमवारी बंद ठेवण्याचा पालिकेचा नियम आहे. मात्र बहुतेक परवानाधारक आणि अनधिकृत व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे सोमवारसह आठवड्याचे सातही दिवस सलून व ब्यूटीपार्लर सुरू ठेवत आहेत. पालिका प्रशासनातर्फे मात्र अशा व्यावसायिकांविरोधात नरमाईची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे कडक कारवाई करा, नाहीतर सलग महिनाभर सर्वच परवानाधारक सलून व ब्यूटीपार्लर व्यावसायिक दुकाने सुरू ठेवतील, असा एल्गार सलून ब्यूटीपार्लर असोसिएशनने केला आहे.
यासंदर्भात संघटनेचे मुंबई अध्यक्ष प्रसाद चव्हाण म्हणाले, ‘मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ अंतर्गत कलम १८ (१ब)नुसार साप्ताहिक सुट्टी म्हणून मुंबईत सलून आणि ब्यूटीपार्लरला सोमवार ठरवून दिलेला आहे. त्यानुसार प्रत्येक सलून व ब्यूटीपार्लर असोसिएशनला सोमवारी दुकान बंद ठेवून कामगारांना सुट्टी देण्याचे बंधन आहे. मात्र मुंबईतील काही परवानाधारक व्यावसायिक आणि मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक सोमवारीही सलून व ब्यूटीपार्लर सुरूच ठेवतात.’ प्रशासनातर्फे सोमवारी दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर किरकोळ कारवाई होत असल्याने व्यावसायिक निर्धास्त झाले आहेत. अनधिकृतपणे सुरू असलेल्या या व्यवसायामुळे परवानाधारक दुकानांचे नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक यादव यांनी केला आहे.