पुष्पकनगर, नयना होणार स्मार्ट सिटी
By Admin | Updated: February 5, 2015 02:11 IST2015-02-05T02:11:23+5:302015-02-05T02:11:23+5:30
नयना प्रकल्प आणि पुष्पकनगर या दोन शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी बुधवारी ही माहिती दिली.

पुष्पकनगर, नयना होणार स्मार्ट सिटी
कमलाकर कांबळे ल्ल नवी मुंबई
नयना प्रकल्प आणि पुष्पकनगर या दोन शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी बुधवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागांत १०० स्मार्ट सिटी विकसीत करण्याचा संकल्प सोडला आहे. अत्यधुनिक पायाभूत सुविधा तेथे असणार आहेत.
भविष्यकालीन नियोजन करताना कचऱ्याचे व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, प्रशस्त रस्ते, पार्किंगच्या सुविधा, रुग्णालये, शाळा व महाविद्यालये आदींचा अंतर्भाव या स्मार्ट सिटी संकल्पनेत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या संकल्पनेच्या आधारे सिडकोने आपल्या प्रस्तावित पुष्पकनगर आणि नयना या दोन शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांचे नियोजित पुष्पकनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. प्रकल्पबाधितांना या ठिकाणी साडे बावीस टक्के योजनेअंतर्गत विकसीत भूखंड देण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया अलिकडेच सुरू करण्यात आली आहे. पुष्पकनगरमध्ये अत्याधुनिक दर्जाच्या सोयिसुविधा देण्याचा सिडकोचा मानस आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार या शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्याचा निर्धार भाटीया यांनी केला आहे.
पुष्पकनगरप्रमाणेच नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नयना क्षेत्राचाही स्मार्ट सिटीच्या धरतीवर विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सुमारे ५६१.७२ चौरस किलोमिटर क्षेत्रात हा प्रकल्प आकारास येणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सुमारे २५ चौरस किमी परिघातील २७० गावांच्या क्षेत्रातील जमीन शासनाने यासाठी आरक्षित केली आहे. नियोजन प्राधिकरण म्हणून सरकारने सिडकोवर जबाबदारी टाकली आहे. नयना प्रकल्पाच्या पहिल्या टप्याचे सुरू आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून पनवेलमधील २३ गावांतील ३७ चौरस किमीक्षेत्राचा विकास आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
राहिलेल्या त्रुटी दूर करणार : सिडकोने नवी मुंबई या अत्याधुनिक शहराची उभारणी केली. मात्र शहराचा विकास करताना अनेक त्रुटी राहिल्याचे कालांतराने सिडकोच्या निदर्शनास आले आहे. यासर्व त्रुटींचा अभ्यास करून पुष्पकनगर आणि नयना प्रकल्प या दोन शहरांचा विकास करण्याची सिडकोची योजना आहे.