तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकलले
By Admin | Updated: July 14, 2015 01:41 IST2015-07-14T01:41:33+5:302015-07-14T01:41:33+5:30
दरवाज्यात उभे राहण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून चौघा जणांनी १८ वर्षीय तरुणाला धावत्या लोकलमधून ढकलल्याची धक्कादायक घटना

तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकलले
मुंबई: दरवाज्यात उभे राहण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून चौघा जणांनी १८ वर्षीय तरुणाला धावत्या लोकलमधून ढकलल्याची धक्कादायक घटना टिळक नगर रेल्वे स्थानकात घडली. ट्रेनचा वेग कमी असल्याने या तरुणाला गंभीर इजा झाली नाही.
अब्दुल शेख असे या जखमी तरुणाचे नाव आहे. तो मुंब्रा येथे राहणारा आहे. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे गोवंडीला जाण्यासाठी पनवेल लोकल पकडली. लोकलला गर्दी असल्याने तो दरवाज्यावर उभा होता. याच वेळी चार जणांचा एक गट देखील दरवाज्याजवळ उभा होता. त्यांना दरवाज्यामध्ये उभे राहायचे होते. त्यांनी अब्दुलला दरवाज्यातून बाजूला होण्यास सांगितले. मात्र तो बाजूला न झाल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून चौघांनी मिळून त्याला मारहाण केली. लोकल टिळक नगर रेल्वे स्थानकावरुन सुटण्याच्या तयारीत असतानाच या आरोपींनी त्याला धावत्या लोकलमधून ढकलले. लोकलचा वेग कमी असल्याने त्याला फारसा मार लागला नाही. (प्रतिनिधी)