प्रस्थापितांना दे धक्का!

By Admin | Updated: August 1, 2015 02:29 IST2015-08-01T02:29:04+5:302015-08-01T02:29:04+5:30

आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना, महिला आरक्षण तसेच प्रभागांच्या विविध संवर्गांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी काढण्यात आली.

Push give to the settlers! | प्रस्थापितांना दे धक्का!

प्रस्थापितांना दे धक्का!

कल्याण : आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना, महिला आरक्षण तसेच प्रभागांच्या विविध संवर्गांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. या सोडतीत अनेक विद्यमान नगरसेवक-नगरसेविकांच्या प्रभागांत आरक्षण लागू झाले असून बहुसंख्य प्रस्थापितांना धक्का बसला आहे. काही पुरुष नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण लागू झाल्याने त्यांची मदार आता कुटुंबातील महिला सदस्यांवर राहणार आहे.
केडीएमसीच्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ही सोडत काढण्यात आली. या वेळी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन, उपायुक्त दीपक पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या वेळी २०११ ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली. वगळलेल्या २७ गावांचा समावेश झाल्याने सद्य:स्थितीला केडीएमसी क्षेत्रातील १५ लाख १७ हजार ८६२ लोकसंख्या पाहता प्रत्येक प्रभागासाठी किमान १२ हजार ६४९ संख्या गृहीत धरली गेली. त्यामुळे यंदा प्रभागांची संख्या १०७ वरून १२२ वर पोहोचली आहे. नवीन नियमानुसार महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवल्यामुळे महापालिका सभागृहात ६१ महिलांची वर्णी लागणार आहे. त्यात अनुसूचित जातीच्या ६, अनुसूचित जमातीच्या २, मागास प्रवर्गातील १७, सर्वसाधारण गटातील ३६ सदस्यांचा समावेश असणार आहे. आरक्षित प्रवर्गात निवडून येणाऱ्या उमेदवाराने निवडून आलेल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे. अन्यथा, नगरसेवकपद रद्द होऊ शकते, असे या वेळी सहायक निवडणूक अधिकारी संजय जाधव यांनी स्पष्ट केले. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीत आपल्या प्रभागाचे काय होणार, या धाकधुकीत असलेल्या विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांच्या मनातील ही धडधड सोडतीच्या वेळी वाजविण्यात आलेल्या ‘टिक टिक वाजते डोक्यात’ या गाण्याने अधिकच वाढत होती. प्रभागाचे आरक्षण आपल्या पसंतीनुसार पडताच सभागृहात एकच जल्लोष होत होता. प्रभाग रचनेसाठी गुगल अर्थचा वापर करण्यात आला असून अत्रे रंगमंदिरातील पहिला मजला, दुसरा मजला आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रभाग रचनांची माहिती नकाशासह देण्यात आली होती. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीला प्रारंभ होताच प्रभाग रचनांची माहितीदेखील नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केली होती. (प्रतिनिधी)

२७ गावांमध्ये महिलाराज

- केडीएमसी क्षेत्रात समावेश झालेल्या त्या २७ गावांचा आढावा घेता या ठिकाणी २१ प्रभागांची निर्मिती झाली असून आरक्षणामध्ये १५ प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी महिलाराज दिसणार आहे.
- प्रभाग क्रमांक ८५ सागाव-आजदे, ११० सोनारपाडा-गोळवली, १११ सागाव-सोनारपाडा, ११२ नांदिवली तर्फ पंचानंद, ११३ मिलाप कॉम्प्लेक्स चर्च, ११४ भोपर संदप, ११८ आशेळे गाव, कृष्णनगर, ११९ माणेरे वसार, १२० हेदुटणे कोळे, १२१ घारिवली काटई उसरघर या प्रभागांसाठी मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण पडले आहे. तर, ११५ नांदिवली पार्क मीनल पार्क, १०६ चिंचपाडा नांदिवली, १०२ कैलासनगर/भगवाननगर, ८६ गोळवली-पिसवली हे चार प्रभाग अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तसेच ११६ माणगाव सोनारपाडा या प्रभागासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे.

Web Title: Push give to the settlers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.