Join us  

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 3:55 PM

मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती (फायनान्शिअल क्लोजर) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

मुंबई - मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्रसमृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती (फायनान्शिअल क्लोजर) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. ५५ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) विविध वित्तीय संस्थांकडून २८ हजार कोटी रुपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे.

वर्षी शासकीय निवासस्थानी झालेल्या या उद्घोषणेवेळी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अरिजित बसू, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एसबीआय कॅप्सचे इव्हीपी सुप्रतिम सरकार आदी मान्यवर उपस्थित होते. 

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी अंदाजे ५५ हजार ४७७ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. त्यापैकी २७ हजार ४७७ कोटी रुपये हे राज्य शासनाच्या वतीने रस्ते विकास महामंडळाचे भागभांडवल असेल तर २८ हजार कोटी रुपये विविध वित्तीय संस्थांमार्फत कर्जस्वरुपात उभे करण्यात आले आहेत. आज या कर्जमंजुरीची उद्दीष्ट्यपुर्ती झाली.  

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी एमएसआरडीसीला भारतीय स्टेट बँक (८ हजार कोटी रुपये), भारतीय आयुर्विमा महामंडळ (४ हजार कोटी रुपये), कॅनरा बँक (४ हजार कोटी रुपये), हुडको (२ हजार ५५० कोटी रुपये), युनियन बँक ऑफ इंडिया (१७०० कोटी रुपये), बँक ऑफ इंडिया (१७०० कोटी रुपये), बँक ऑफ बडोदा (१५०० कोटी रुपये), आंध्र बँक (१५०० कोटी रुपये), आयआयएफसीएल (१३०० कोटी रुपये), इंडियन बँक (७५० कोटी रुपये), बँक ऑफ महाराष्ट्र (५०० कोटी रुपये) आणि सिंडिकेट बँक (५०० कोटी रुपये) या वित्तीय संस्थांकडून कर्ज प्राप्त झाले आहे. या प्रकल्पासाठी विविध वित्तीय संस्थांकडून निधीची उभारणी करता यावी यासाठी भारतीय स्टेट बँक शिखर बँक म्हणून कार्यरत होती तर एसबीआय कॅप्स लिमिटेड यांनी प्रकल्पाच्या व्यवहार सल्लागाराची भूमिका पार पाडली.

समृद्धी महामार्ग देशातील पहिला सर्वाधिक ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग ठरणार आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे लिमिटेड या विशेष उद्दिष्ट वाहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. सहापदरी असलेल्या समृद्धी महामार्गाची रुंदी १२० मीटर असेल. या द्रुतगती महामार्गावरून ताशी १५० किमी वेगाने वाहने धावू शकणार आहेत. तसेच समृद्धी महामार्गावर विकसित केल्या जाणाऱ्या २० कृषी समृद्धी केंद्रांच्या माध्यमातून नजीकच्या भविष्यात राज्याचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणारा समृद्धी महामार्ग १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे मुंबईशी जोडणार आहे.

केवळ नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना वेगवान वाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हाच या द्रुतगती महामार्गाचा मर्यादित हेतू नसून समृद्धी महामार्गाच्या रुपाने पूर्व महाराष्ट्र थेट पश्चिम महाराष्ट्राशी व मुंबई आणि जेएनपीटी बंदराशी जोडला जाणार आहे. तसेच वेस्टर्न कॉरिडॉर आणि सुवर्ण चतुष्कोन या महामार्गांनाही समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रसमृद्धी महामार्ग