भाडेतत्त्वावर पोशाख खरेदीचा ट्रेण्ड
By Admin | Updated: October 8, 2015 23:38 IST2015-10-08T23:38:52+5:302015-10-08T23:38:52+5:30
गेल्या काही वर्षांत नवरात्रोत्सवाला कमर्शियल इव्हेंटचे स्वरूप आले आहे. त्यामुळे बाजारात गरब्याच्या पोशाखापासून दागिन्यांपर्यंत सर्व वस्तूंची चलती आहे.

भाडेतत्त्वावर पोशाख खरेदीचा ट्रेण्ड
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
गेल्या काही वर्षांत नवरात्रोत्सवाला कमर्शियल इव्हेंटचे स्वरूप आले आहे. त्यामुळे बाजारात गरब्याच्या पोशाखापासून दागिन्यांपर्यंत सर्व वस्तूंची चलती आहे. महागाईमुळे गरबा पोशाखांचे भाव पण वाढलेत, शिवाय वर्षातून एकदाच तो पेहराव घालायचा असल्याने विकत घेण्यापेक्षा भाडेतत्त्वाने घेऊ असा विचार करणारे अनेक जण आहेत, त्यामुळे हे सर्व साहित्य विकत घेण्यापेक्षा ते भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे.
गरब्यासाठी अवघे चार दिवस राहिले असताना, भाडेतत्त्वावर पोशाख खरेदी करण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासूनच इच्छुकांनी अॅडव्हान्स बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस जागवायचे तर गरबा-दांडियाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. कारण, गरबा-दांडियाच्या ठेक्यावर तर तरुणाईची पावलं थिरकतात.
प्रत्येक वर्षी फॅशन बदलते आणि कपडे खरेदी केले जातात. यावर पर्याय म्हणून भाडे देऊन दिवसभरासाठी कपडे घेण्याची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे. पारंपरिक पेहराव असलेले केडिया, धोती, जॅकेट यांचे बुकिंग जोरात सुरू आहे. पहिले चार दिवस ६०-७० पेहरावांना तर शेवटी शेवटी दिवसाला ५००-७०० पोशाखांचे बुकिंग होते. नऊ दिवसांच्या नऊ रंगानुसारही पोशाख उपलब्ध करुन देण्यासाठी यंदा दुकानदार प्रयत्नात असल्याची माहिती राजू पटेल या पोशाख विक्रेत्याने दिली.
दागिन्यांसाठी २०० - ३०० रु पये भाडे आकारले जाते. बॅकलेस चोलीला यंदा मोठी मागणी आहे. दिवसानुसार कपड्यांचे भाडे आकारले जात असून एका दिवसाला ५०० ते १५००० रुपये दर आहे. नवरात्रोत्सवात एका व्यावसायिकाकडून आठशे ते हजार ड्रेस भाडेतत्त्वावर दिले जात असल्याने व्यावसायिकांचाही धंदा तेजीत होतो.