Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीच्या अध्यक्षाची शिक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 07:48 IST

दोघांनाही मुंबई महापालिका कायद्याअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. जून २०१० मध्ये महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने संबंधित इमारतीची पाहणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हाऊसिंग सोसायटीमध्ये आवश्यक असलेली दुरुस्ती न केल्याबद्दल दंडाधिकारी न्यायालयाने सोसायटीच्या अध्यक्षांना ठोठावलेली तीन महिने कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरवली. 

दादरच्या जास्मिन को-ऑप. हौ. सोसा. लि. चे अध्यक्ष विनोद शहा आणि सचिव बी. व्ही पतंगे यांना एक सारखीच शिक्षा ठोठावण्यात आली. तीन महिने कारावास आणि १० हजार रुपये दंड. मात्र, अपील प्रलंबित असताना  अध्यक्षांचे निधन झाले. 

दोघांनाही मुंबई महापालिका कायद्याअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. जून २०१० मध्ये महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने संबंधित इमारतीची पाहणी केली होती. इमारतीचे बीम आणि कॉलममध्ये भेगा होत्या. बाथरूमला गळती होती आणि प्लास्टरही निघाल्याचे पाहणीत आढळले. त्यामुळे पालिकेने दोन्ही पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. नोटीस बजावूनही सोसायटीची नोव्हेंबरपर्यंत दुरुस्ती करण्यात न आल्याने पालिकेने तक्रार केली. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. नाईक-निंबाळकर यांनी अस्पष्ट आणि अपूर्ण पुराव्यांच्या आधारे आरोपीवरील आरोप सिद्ध होत नाही, असे म्हणत आरोपींना सुनावलेली शिक्षा रद्द केली.