Join us

कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका

By मनीषा म्हात्रे | Updated: April 17, 2025 12:47 IST

Cyber Slaves Mumbai police: लष्करी सरकारच्या थेट नियंत्रणाखाली नसलेल्या म्यावाड्डी परिसरातील जंगलात हे 'सायबर गुलामगिरी'चे शिबीर चालवले जात होते.

- मनीषा म्हात्रे, मुंबई परदेशात नोकरीसाठी मुंबईच्या मुद्दशरने थायलंड गाठले. बँकॉकच्या गगनचुंबी इमारतींमधील आलिशान कार्यालयात न पोहोचता तो म्यानमारच्या एका चहूबाजूने शस्त्रधारी असलेल्या निर्जन कंपाउंडमध्ये पोहोचला. तेथे प्रत्येकाकडून मारून, झोडून, अमानुष छळ करत सायबर फसवणुकीचे कामे करून घेतली जात होती. कामादरम्यान पायावर पाय जरी ठेवला तरी थेट शिक्षा करत होते, असे म्यानमारमधून सुटका झालेला मुद्दशर सांगतो.

लष्करी सरकारच्या थेट नियंत्रणाखाली नसलेल्या म्यावाड्डी परिसरातील जंगलात हे 'सायबर गुलामगिरी'चे शिबीर चालवले जात होते. मुद्दशरला तिथेच ठेवले होते. महाराष्ट्र सायबर विभागाने ६० जणांची सुटका केली. आशिया, पूर्व आफ्रिका, दक्षिण अमेरिका, पश्चिम युरोपमधील तरुण-तरुणींना नोकरीचे आमिष दाखवले जाते. जे लोक हुकूम मानत नाहीत, त्यांना मारहाण केली जाते असल्याचेही या तरुणांचे म्हणणे आहे.

मुद्दशर सांगतो, विदेशात नोकरीचे स्वप्न होते. मात्र ते स्वप्न प्रत्यक्षात एवढ भयाण असेल असे वाटले नव्हते. विदेशात नोकरीच्या आमिषाने थायलंड मध्ये नेले. तेथे उतरताच पासपोर्ट काढून घेतले. म्यानमारमधील एका गावात नेण्यात आले. येथे अत्याचार करुन आम्हाला सायबर फसवणूकीचे गुन्हे करण्यास भाग पाडले. 

कामात चूक झाली. किंवा पायावर पाय घेऊन आरामत बसलेला दिसल्यास वेतनातून पैसे कापून घेतले जात होते. कोणी विरोध करताच काहींची नखे उखडली. तर काहींना अवयव काढण्याची भीती घातली जात होती. काही जण पैसे देऊन स्वतःची सुटका असल्याचे तो सांगतो.

थेट केला जायचा सौदा...

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपैकी एका टोळीला त्याला विकण्यात आल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. तस्करी करून तिथे आणलेल्या तरुणांना या टोळ्यांचे म्होरके त्यांच्यासाठी काम करण्यास भाग पाडतात. 

४ ते ५ हजार डॉलर्समध्ये यांची विक्री करून २० ते २२ तास काम करून घेतले जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

वेळीच सतर्क होणे गरजेचे

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये बेकायदेशीर जुगार, क्रिप्टोकरन्सीशी संबंधित ऑनलाईन गुन्हे करणाऱ्या टोळ्यांमध्ये काम करण्यासाठी सव्वा लाखापेक्षा जास्त लोकांना म्यानमारमध्ये तस्करी करून आणले गेले. 

कंबोडियामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकांना हे काम करण्यास भाग पाडले होते. आजही अनेक जण यात अडकत आहे. त्यामुळे वेळीच सतर्क होणे गरजेचे असल्याचे सायबर विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :मानवी तस्करीसायबर क्राइममुंबई पोलीसगुन्हेगारी