ग्लोबलला ठोठावला पालिकेने दीड कोटींचा दंड
By Admin | Updated: January 26, 2015 00:52 IST2015-01-26T00:52:39+5:302015-01-26T00:52:39+5:30
पालिकेने २० जानेवारी २०१२ रोजी नव्याने दिलेल्या कचरा ठेकेदाराने कामात वेळोवेळी कुचराई केल्याचा ठपका ठेवून गेल्या तीन वर्षांत सुमारे दीड कोटींचा दंड वसूल केला आहे.

ग्लोबलला ठोठावला पालिकेने दीड कोटींचा दंड
राजू काळे, भार्इंदर
पालिकेने २० जानेवारी २०१२ रोजी नव्याने दिलेल्या कचरा ठेकेदाराने कामात वेळोवेळी कुचराई केल्याचा ठपका ठेवून गेल्या तीन वर्षांत सुमारे दीड कोटींचा दंड वसूल केला आहे.
पालिकेने २०११ पर्यंत राजकीय पाठबळ लाभलेल्या स्थानिक ठेकेदारांना शहरातील कचरा सफाईचे कंत्राट दिले होते. राजकीय हितसंबंधामुळे कामातील दिरंगाईकडे प्रशासन नेहमीच काणाडोळा करीत असल्याने तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी अखेर २० जानेवारी २०१२ रोजी स्थानिक कंत्राटदारांच्या हातात सोपविलेली शहराची स्वच्छता काढून घेतली आणि मुंबईच्या धर्तीवर नव्याने व अद्ययावत स्वच्छतेची उपकरणे असलेल्या ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीला ३८ कोटी ८६ लाखांचा सफाईचा ठेका दिला. यामुळे स्थानिक ठेकेदारांच्या (विना) मेहनतीची कमाई गेल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे सावट घोंघावू लागले. त्या वेळी स्थानिक राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने स्थानिक ठेकेदारांना शहरातील कचरा उचलण्यासाठी उपठेकेदार म्हणून नियुक्त करून मूळ ठेका मात्र ग्लोबल कंपनीचा ठेवण्यावर निर्णय घेण्यात आला. त्याला ग्लोबलने नाइलाजास्तव होकार दिल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून कचऱ्याचा ठेका प्रत्यक्षात स्थानिक ठेकेदारांकडून चालविण्यात येत आहे. यात पालिकेसोबत ग्लोबलचा करार झाल्याने कचरा उचलण्याच्या कुचराईचा फंडा नित्यनेमाने सुरूच आहे. त्याचा फटका मूळ ठेकेदाराला बसत असून पालिकेकडून वेळोवेळी होत असलेल्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.