Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील मुस्लिमांची काळजी पाकिस्तानने करू नये; ओवेसींचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:30 IST

प्रकाश आंबेडकर यांचेही टीकास्त्र । वंचित बहुजन विकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई : पुलवामा हल्ला मोदी सरकारचे मोठे अपयश आहे. पुलवामा हल्ला मुत्सद्दीपणाचा, राजकीय आणि गुप्तचर यंत्रणेचा पराभव असून, येथील मुस्लीम समाजाच्या अधोगतीस काँग्रेस सरकारही जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

दादर येथील शिवाजी पार्कमध्ये शनिवारी सायंकाळी वंचित बहुजन विकास आघाडीची विराट सभा पार पडली. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

ओवेसी म्हणाले, पुलवामामध्ये झालेला भ्याड हल्ला हा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. हल्ला झाला तेव्हा देशातील सुरक्षा यंत्रणा काय करीत होत्या, याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे. ४० जवान या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यास पाकिस्तान सरकार, आयएसआय, दहशतवादी जबाबदार आहेत. पाकिस्तानकडून आधी उरी, पठाणकोट आणि आता पुलवामा झाले. त्यामुळे पाकिस्तानच्या शब्दांवर आमचा विश्वास नाही. पाकिस्तानी मंत्री म्हणतो की, युद्ध झाले तर मंदिरातील घंटा वाजणार नाही. तुम्ही देशाला ओळखले नाही. येथे जोवर मुस्लीम आहे तोवर मशिदींतून अजान, मंदिरांतून घंटानाद, चर्च, गुरुद्वारांमधून प्रार्थनेचे सूर उमटत राहतील. जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्व एक असतो. पाकिस्तानी नेत्यांनी भारतातील मुस्लिमांची काळजी करण्याचे सोडून द्यावे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सर्वच राजकीय पक्षांतील नेते बिल्डर आहेत. ते मिळेल तेथे जमीन गिळंकृत करत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक बांधवांना जमिनी मिळत नाहीत. आम्ही तुम्हाला मदत करू. पण त्यासाठी तुम्ही शिवसेनेला सोडाल का, असा प्रश्नही त्यांनी केला. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आगरी, कोळी, भंडाऱ्यांच्या वस्ती, ईस्ट इंडिया वस्ती या वस्त्यांवर जेसीबी चालविली जाईल. आता निवडणुका असल्याने कारवाई होत नाही. मुस्लीम बदमाश आहेत, असा अपप्रचार केला जातो. या सर्व वस्त्यांमध्ये जेसीबी लावलेले कोण होते? तो मुस्लीम होता का? जो बिल्डर होता तो अन्य समाजाचा होता. त्यामुळे आपल्या विरोधात येथील बिल्डर आहेत.

आरएसएसच्या धर्माची सत्ता आली. मात्र भटक्या विमुक्तांकडे भिक्षेशिवाय जगण्याचे साधन नाही. हा हिंदू नाही का? काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा जनतेचे ऐकण्यास तयार नाही. हे सर्व पक्ष एकाच नाण्याच्या बाजू आहेत, असा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले की, नवीन पेशवाई गाडल्याशिवाय राहणार नाही. तलवार दिली तर कापून टाकतो आणि लेखणी दिली तर संविधान घडवितो. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदी आणि भाजपाचे सरकार येणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करणार आहोत. लोकशाही वाचवून नवीन पेशवाई गाडली पाहिजे.खुर्ची वाचवण्यासाठी पाणी गुजरातलायेथील सरकार महाराष्टÑाच्या वाट्याचे ३५ टीएमसी पाणी गुजरातला द्यायला निघाले आहे. कारणकाय तर पंतप्रधान गुजरातचे आहेत. आपली खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री हे पाणी देणार आहेत. पण इथला माणूस तडफडतोय, त्याला पाणी दिले जात नाही. शिवसेनेने सांगावे त्यांनी कधी ३५ टीएमसी पाणी गुजरातला देण्यावर तोंड उघडले आहे का, असा घणाघाती हल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्तारूढ शिवसेना-भाजपावर चढवला.

टॅग्स :असदुद्दीन ओवेसीमुंबईप्रकाश आंबेडकर