Join us
Daily Top 2Weekly Top 5

भांडणात महिलेचे केस ओढणे, हा विनयभंग नाही; बागेश्वर बाबांच्या पाच अनुयायांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:33 IST

न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांचे पाच अनुयायी अभिजित करंजुळे, मयुरेश कुलकर्णी, ईश्वर गुंजाळ, अविनाश पांडे आणि लक्ष्मण पंत यांच्यावर आयपीसी कलम ३५४  लागू करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यास नकार दिला.

मुंबई : भांडणाच्या वेळी महिलेचे केस ओढणे, तिला धक्काबुक्की करणे म्हणजे तिच्या विनयशीलतेचा अपमान करणे नाही. कारण त्यासाठी आधी विनयभंग करण्याचा हेतू असला पाहिजे, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने बागेश्वर बाबाच्या पाच अनुयायांना दिलासा दिला.

न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांचे पाच अनुयायी अभिजित करंजुळे, मयुरेश कुलकर्णी, ईश्वर गुंजाळ, अविनाश पांडे आणि लक्ष्मण पंत यांच्यावर आयपीसी कलम ३५४  लागू करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यास नकार दिला.

या पाचही जणांनी नितीन उपाध्याय यांना मारहाण केल्याचा आणि त्यांच्या पत्नीचे केस ओढून तिला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. मात्र, उपाध्याय यांच्या पत्नीने तिला अयोग्य पद्धतीने हात लावण्यात आल्याचे आणि तिचा विनयभंग करण्याचा आरोपींचा हेतू होता, असे तक्रारीत म्हटलेले नाही. एखाद्या महिलेबरोबर भांडण झाले की केस ओढणे आणि धक्काबुक्की केली जाते; पण यामध्ये तिचा विनयभंग करण्याचा हेतू होता, हे स्पष्टपणे दाखवावे लागेल. असे प्रत्येक प्रकरण विनयभंगाचे नसते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

-  पत्नीने पोलिस जबाबात आरोपींनी आपल्याशी वाईट वर्तन केल्याचे म्हटले असून बलात्कार प्रकरणांत पीडिता सुरुवातीला आरोपीने ‘वाईट वर्तन’ केल्याचे सांगते. त्यानंतर आरोपीने काय-काय केले ते सांगते, असे यावेळी उपाध्याय यांच्या वतीने सांगण्यात आले. पण न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.

टॅग्स :न्यायालयबागेश्वर धाम