पुजित अगरवालच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: September 17, 2016 03:44 IST2016-09-17T03:44:48+5:302016-09-17T03:44:48+5:30
फसवणूकीच्या गुन्ह्यांत आझाद मैदान पोलिसांच्या कोठडीत असलेले आॅर्बिट हाईट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक पुजित अगरवालच्या कोठडीत २० सप्टेंबरपर्यंत वाढ

पुजित अगरवालच्या कोठडीत वाढ
मुंबई : फसवणूकीच्या गुन्ह्यांत आझाद मैदान पोलिसांच्या कोठडीत असलेले आॅर्बिट हाईट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक पुजित अगरवालच्या कोठडीत २० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या वडिलांचा अटकपूर्व जामीन अर्जही उच्च न्यायालयाने फेटाळला.
अगरवाल याने २००८ साली साकिनाका परिसरात आॅर्बिट रेसीडेन्सी पार्क या गृहनिर्माण प्रकल्पाची सुरुवात केली. त्यासाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून कर्ज घेतले. परतफेड करण्यासाठी एक संयुक्त खाते उघडण्यात आले. अग्रवालने काही घरांची नोंदणी रक्कम परस्पर आपल्या खात्यात वळविल्याचे एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या लक्षात आले. कंपनीने ही इमारत सील केली. त्यात तीन घरांची नोंदणी केलेल्या कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड यांनी गुंतवलेले २.५३ कोटी रुपये बुडविल्याची तक्रार त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.पुजितला आज न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणात २६० कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. त्यापैकी १७० कोटींचा खर्च झाला. मात्र अन्य रकमेचे काय झाले याबाबत अधिक तपास करण्यासाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. त्याच्या घर, कार्यालयामधील झडतीतही हाती काही लागलेले नाही.
पुजितचे वडील रवीकिरण यांच्याही अटकेची तयारी पोलिसांनी केली. अटक टाळण्यासाठी रवीकिरण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्यांचा अटक पूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे. तसेच यातील अन्य एका गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून पिता - पुत्रांकडे तपास सुरूआहे. यातूनही अटक टाळण्यासाठी पिता - पुत्राने दाखल केलेला आणखीन एक अटक पूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन दाखल न करता थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याने दोन्हीही अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत. त्यातच डी. बी. मार्ग येथील प्रकरणातही अगरवाल यांचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.