Join us  

जनता गद्दारांना धडा शिकवेल; गावितांच्या भाजपा प्रवेशानंतर अशोक चव्हाणांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 9:27 PM

राजेंद्र गावित दोनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना मिळणार नाही, याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती.

 मुंबई: राजेंद्र गावित यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असून गावीत हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. याचा अर्थ त्यांनी काँग्रेस पक्षात राहून पक्षाशी गद्दारी केली. पालघर लोकसभा मतदार संघातील जनता गद्दाराला धडा शिकवेल, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचा उमेदवार शिवसेनेने पळवला म्हणून भाजपने आमच्या गावितांना पळवले पक्षनिष्ठा नावाचा प्रकार राहिला नाही. भाजप पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून नेत्यांची पळवापळवी करत आहे. भाजपाने नैतिकता सोडली आहे.

देशामध्ये 282 खासदार आणि राज्यात 122 आमदार, 21 राज्यात सत्ता, पालघरमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यातला सर्वात मोठा पक्ष वल्गना करणाऱ्या भाजपला स्वतःचा एक उमेदवारही मिळू नये, हे लांछनास्पद आहे. भारतीय जनतापक्षाची कीव करावीशी वाटते. राजेंद्र गावित दोनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना मिळणार नाही, याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती. अशा पडेल उमेदवाराला घेऊन भाजपाने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. जनता अशा पडेल उमेदवाराला आणि भाजपला पुन्हा तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाही, असे चव्हाण यांनी म्हटले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माजी खा. दामू शिंगडा यांची पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे शिफारस केली आहे पक्षश्रेष्ठी त्याबाबत लवकरच निर्णय घेतील, असे चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :पालघर पोटनिवडणूक 2018भाजपा