आझाद मैदानातील आंदोलकांवरही चढला ‘सोनू’चा फिव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:02 IST2017-07-27T06:02:46+5:302017-07-27T06:02:50+5:30
‘या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, ‘कोण बोलतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’ या नेहमीच्या घोषणांना मागे टाकत आता आझाद मैदानावर धडकणाºया आंदोलकांवर ‘सोनू’ची जादू दिसत आहे

आझाद मैदानातील आंदोलकांवरही चढला ‘सोनू’चा फिव्हर
मुंबई : ‘या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, ‘कोण बोलतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’ या नेहमीच्या घोषणांना मागे टाकत आता आझाद मैदानावर धडकणाºया आंदोलकांवर ‘सोनू’ची जादू दिसत आहे. ‘सोनू तुझा सरकारवर भरोसा नाय काय!’ या नव्या गाण्यावर ठेका धरत हलबा जमातीच्या आंदोलकांनी सरकारविरोधात बुधवारी आझाद मैदानात जोरदार घोषणा दिल्या.
हलबा व हलबी अनुसूचित जमातीच्या कर्मचाºयांची सेवा जात प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे संपुष्टात आणण्यात आली आहे. त्याविरोधात राज्य सरकारने विशेष अधिकार वापरून शासन निर्णय घेऊन सर्व कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याची राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाची मुख्य मागणी होती. त्यासाठी आंदोलकांनी सरकारला खास ‘सोनू स्टाईल’मध्ये गाºहाणे घातले.
महिला आंदोलकांनी एका सुरात गायलेल्या या गाण्यानंतर संपूर्ण आझाद मैदानात हलबा जमातीच्या मागण्यांची चर्चा ऐकू आली. आश्चर्याची बाब म्हणजे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करणारे इतर आंदोलकही या वेळी हलबा आंदोलकांना साद देताना दिसले.
आरजे मलिष्काने याच ठेक्यावर गायलेल्या गाण्यामध्ये मुंबई महापालिकेविरोधात जोरदार शेरेबाजी केली होती. त्यानंतर महापालिकेची बदनामी केल्याचा आरोप करत शिवसेना नेत्यांनी मलिष्काविरोधात कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. मात्र या सर्व प्रकारादरम्यान सोशल मीडियामध्ये हे गाणे भलतेच व्हायरल झाले. त्याचीच मदत घेत आता आंदोलकही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या ढिंगच्याक गाण्याची मदत घेताना दिसत आहेत.
गांधी टोपीची जादू विरली!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या जनआंदोलनानंतर आझाद मैदानातील आंदोलकांमध्येही गांधी टोपी घालण्याचा ट्रेंड दिसून आला होता. आझाद मैदानावर धडकणाºया विविध मोर्चांमधील आंदोलक गांधी टोपीवर स्वत:च्या संघटनेचे नाव किंवा मागणीचे स्लोगन लिहून येतात. जेणेकरून अधिकाधिक लोकांद्वारे आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवता येईल. मात्र त्याचे प्रमाण आता काहीसे कमी होताना दिसत आहे.