Join us

राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 07:14 IST

अमराठी, परप्रांतीय लोकांना मारहाण प्रकरण

मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अमराठी व परप्रांतीय लोकांना मारहाण व धमकविण्याच्या प्रकारांबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शुक्ला यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. त्यामुळे त्यांनी याचिका मागे घेत राज ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

भारतीय निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत कारवाईचा विचार करण्याचे निर्देश द्यावेत. समाजात द्वेष आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी मनसेची मान्यता रद्द करावी, या मागणीसह शुक्ला यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

भाषण करण्यास मनाईची मागणी 

राज ठाकरे यांना भाषणे देण्यास मनाई करावी, अशी अंतरिम मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. शुक्ला यांनी याचिकेत म्हटले आहे की, ६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता मनसे आणि सहयोगी संघटनांशी संबंधित सुमारे ३० जणांनी त्यांच्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात घुसखोरी करून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर शुक्ला व त्यांच्या कुटुंबीयांना कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन आले. संबंधित पक्ष कार्यकर्त्याविरोधात तक्रार केली आणि १० महिने त्याचा पाठपुरावाही केला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 

टॅग्स :राज ठाकरेउच्च न्यायालय