‘सेग्रेगेशन मॅन’ करणार जनजागृती

By Admin | Updated: January 9, 2017 07:03 IST2017-01-09T07:03:18+5:302017-01-09T07:03:18+5:30

महापालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ विभागातून जमा करण्यात येणाऱ्या कचऱ्याची विभाग स्तरावरच सुयोग्य प्रकारे विल्हेवाट लावता

Public awareness of 'Serenity Man' | ‘सेग्रेगेशन मॅन’ करणार जनजागृती

‘सेग्रेगेशन मॅन’ करणार जनजागृती

मुंबई : महापालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ विभागातून जमा करण्यात येणाऱ्या कचऱ्याची विभाग स्तरावरच सुयोग्य प्रकारे विल्हेवाट लावता यावी, यासाठी या विभागात विविध प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये घरोघर जाऊन कचरा संकलन, कचऱ्याचे विभाग स्तरावर वर्गीकरण करता यावे, यासाठी कचरा वर्गीकरण केंद्र, उद्यानातील कचऱ्याचे विघटन व्हावे, यासाठी गांडूळ खत प्रकल्प व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांसोबतच आता कचरा वर्गीकरणाच्या जनजागृतीसाठी ‘सेग्रेगेशन मॅन’ या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
‘एफ दक्षिण’ विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, या उपक्रमांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण
वेषभूषा केलेल्या स्वयंसेवकांनी विभागातील विविध परिसरांमध्ये जाऊन कचरा वर्गीकरणाबाबत प्रात्यक्षिकांसह जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. कचऱ्याचे सुयोग्य वर्गीकरण करणे ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल व महत्त्वाची आहे.
कचऱ्यामधील विविध घटकांचे त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण केल्यास पुनर्चक्रीकरण करता येईल असा कचरा पुनर्चक्रीकरणासाठी पाठविणे, तर जैविक पद्धतीने विघटनशील कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणे सुलभ होते. ही बाब लक्षात घेऊन विभागातील शाळा, महाविद्यालये व इतर परिसरांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी ‘सेग्रेगेशन मॅन’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Public awareness of 'Serenity Man'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.