जेवणाच्या डब्यातून मतदानाची जनजागृती
By Admin | Updated: February 21, 2017 06:39 IST2017-02-21T06:39:28+5:302017-02-21T06:39:28+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडणार आहे.

जेवणाच्या डब्यातून मतदानाची जनजागृती
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडणार आहे. तरी मुंबईकरांना मतदानाची आठवण करून देण्यासाठी जेवणाच्या डब्यात चिठ्ठी ठेवून मुंबईच्या डबेवाल्यांनी सोमवारी जनजागृती केली.
निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी चाप लागला असला, तरी मतदानाबाबत जनजागृती करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. या दिवसाचा पुरेपूर फायदा उचलताना डबेवाल्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन, मुंबईच्या मतदारांना मंगळवारी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. त्यासाठी डबेवाल्यांनी ग्राहकांच्या जेवणाच्या डब्यात ‘मतदान करा’ या आशयाची चिठ्ठी ठेवली. अशा प्रकारे लाखो मुंबईकरांपर्यंत मतदानाबाबत जनजागृती झाल्याचा दावा, मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)