Join us

धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी महागडा फोन न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 12:13 IST

PUBG खेळण्यासाठी पालकांनी महागडा स्मार्टफोन विकत घेऊन न दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

ठळक मुद्देPUBG खेळण्यासाठी पालकांनी महागडा स्मार्टफोन विकत घेऊन न दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली आहे.37 हजारांचा स्मार्टफोन घेणं पालकांना शक्य नसल्याने त्यांनी मुलाला फोन घेऊन देण्यास नकार दिला. आई-वडिलांनी फोन न दिल्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

मुंबई - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG खेळण्यासाठी पालकांनी महागडा स्मार्टफोन विकत घेऊन न दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने पालकांकडे PUBG खेळण्यासाठी महागड्या स्मार्टफोनचा हट्ट धरला होता. मात्र 37 हजारांचा स्मार्टफोन घेणं पालकांना शक्य नसल्याने त्यांनी मुलाला फोन घेऊन देण्यास नकार दिला. आई-वडिलांनी फोन न दिल्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी 'PUBG' या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी एका चिमुकल्याने केली होती. मुंबईतील 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने PUBG वर बंदी आणा असं सांगणार एक पत्र केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिलं होतं. अहद असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं. 

PUBG मुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहेत. तसेच मुलं हिंसक होत असल्याचं सांगत अहदने या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. अहदची आई मरियम नियाझ या वकील आहेत. 'सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,' असे त्यांनी म्हटलं होतं. तसेच पबजी खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाला महागात पडली होती. सलग 10 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती समोर आली होती.   

टॅग्स :पबजी गेमआत्महत्यामुंबई