Join us

'स्वर समर्पण' कार्यशाळा! पं. रघुनंदन पणशीकर देणार स्वराभ्यासाचा मंत्र, शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:48 IST

शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी, अभ्यासक आणि कानसेनांसाठी विशेष संधी आहे.

शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी, अभ्यासक आणि कानसेनांसाठी विशेष संधी आहे. मुंबईत येत्या १० ऑगस्ट रोजी 'स्वर समर्पण' ही कार्यशाळा होणार आहे. प्रख्यात शास्त्रीय गायक व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर या कार्यशाळेत स्वराभ्यासाचा मंत्र देणार आहेत. ग्लिटरेटी म्युझिक एकॅडमीने कार्यशाळेचं आयोजन केलं आहे.

वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यशाळेत पं. पणशीकर हे विद्यार्थ्यांना संगीतातील बारकावे उलगडून दाखवणार आहेत. शास्त्रीय आणि सुगम संगीतासाठी आवश्यक असलेला स्वराभ्यास, स्वर विस्तार, स्वरांची लवचिकता, ख्याल संगीतामधील रचनात्मक तंत्र, गायनासाठी लागणारा दमसास, पारंपरिक बंदिशींमधील सौंदर्य यावर सखोल मार्गदर्शन करतील.

पं. पणशीकर यांच्यासोबत प्रश्नोत्तराचं सत्र देखील होईल. या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान ३ ते ४ वर्षे गायन शिक्षण घेतलेलं असणं गरजेचं आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नोंदणीसाठी पराग खोत (९७६९२०१०९९) यांच्याशी संपर्क साधावा.

टॅग्स :मुंबई