Join us

चेंबूरकरांसाठी आधुनिक सुविधांचे स्वच्छतागृह, स्वच्छ पाणी, सॅनिटरी पॅड वेंडिंग संयंत्राची सोय

By सीमा महांगडे | Updated: October 16, 2023 19:11 IST

चेंबूर येथे सुरु करण्यात आलेल्या  केंद्रामध्ये शौचालयासोबतच स्वच्छ पाणी, कपडे धुलाई संयंत्र आदी सुविधा उपलब्ध आहे. महिलांसाठी २८ शौचकुपे असणारे स्वतंत्र शौचालय देखील उभारण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पंजाबी चाळ येथे पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीसाठी हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचएसबीसी यांच्या सामाजिक दायित्व जबाबदारी (सीएसआर) उपक्रमाच्या माध्यमातून ६४ शौचकुपे असलेल्या शौचालयाचे सोमवारी पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. शौचालय सुविधेसोबतच स्वच्छ पाणी, लॉण्ड्री, सॅनिटरी पॅड वेंडिंग संयंत्र, सौर ऊर्जा आदी सुविधांचा समावेश आहे.  यावेळी या आधुनिक प्रसाधनगृहाची देखरेख स्थानिक प्रशासन करत असताना, स्थानिक नागरिकांनी देखील त्यांचे पालकत्व स्वीकारत सरकारला, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन लोढा यांनी केली. लोकसहभागातून हे मॉडेल यशस्वी होवू शकत असल्याची खात्री ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

चेंबूर येथे सुरु करण्यात आलेल्या  केंद्रामध्ये शौचालयासोबतच स्वच्छ पाणी, कपडे धुलाई संयंत्र आदी सुविधा उपलब्ध आहे. महिलांसाठी २८ शौचकुपे असणारे स्वतंत्र शौचालय देखील उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी आपत्कालीन स्थितीसाठी पॅनिक बटन आणि सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देखील पुरवण्यात आले आहे. सॅनिटरी पॅड विल्हेवाट लावणारे संयंत्र देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुरूषांसाठी ३८ शौचकुपे असणारे स्वतंत्र शौचालय आहे. त्याठिकाणी हात स्वच्छ धुण्यासाठीची तसेच पाय धुण्याचीही स्वतंत्र व्यवस्था आहे. दोन्ही शौचालयांच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा लावलेली आहे. नाममात्र शुल्क देवून नागरिकांना शौचालय, स्वच्छ पाणी तसेच लॉण्ड्री सुविधेचा वापर करता येणार आहे. 

सोलर पॅनेलमुळे विजेचा ७५ टक्के खर्च कमी होणार 

या प्रसाधनगृहाच्या देखभालीसाठीच्या निमित्ताने एकूण दहा स्थानिक व्यक्तिंना याठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे. महिला आणि पुरूष अशा दोन्हींचा यामध्ये समावेश आहे. तर केंद्र प्रमुख आणि लॉण्ड्री व्यवस्थापक अशा पद्धतीने १२ जणांचे पथक याठिकाणी देखभाल आणि सेवेसाठी कार्यरत असेल. सदर केंद्रामध्ये वापरात येणाऱ्या यंत्रांसाठी आणि अंतर्गत दिव्यांच्या व्यवस्थेसाठी दोन्ही इमारतींवर मिळून १९ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा (सोलार) पॅनेलही लावण्यात आले आहेत. त्यामुळे विजेवर होणारा ७५ टक्के खर्च कमी होण्यासाठी मदत होईल. शौचालयाच्या इमारतीत आरओ वॉटर प्लांट आणि पाणी पुनर्प्रक्रिया करणाऱ्या प्लांटचाही समावेश आहे. स्वच्छता आणि फ्लशसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येईल. पाण्याच्या पुनर्वापरामुळे वर्षापोटी ५० लाख लिटर पाण्याची बचत याठिकाणी करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :मुंबई