अर्थसंकल्पात तरतूद; पण शौचालयांच्या समस्या सुटेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:09 IST2021-02-06T04:09:23+5:302021-02-06T04:09:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शौचालयांसाठी तरतूद करण्यात आली असली तरी आजही जुन्या इमारती, चाळी, ...

अर्थसंकल्पात तरतूद; पण शौचालयांच्या समस्या सुटेनात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शौचालयांसाठी तरतूद करण्यात आली असली तरी आजही जुन्या इमारती, चाळी, झोपड्यांमधील शौचालयांची समस्या कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे हगणदारीमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिका काम करत असली तरी नादुरुस्त शौचालये दुरुस्त करण्याबाबत आवश्यक कामकाज केले जात नसल्याने आजही नागरिकांना अस्वच्छ शौचालयांचा वापर करावा लागत आहे. विशेषत: चाळी आणि झोपड्यांमध्ये ही समस्या कायम असून, पहिल्यांदा आहेत ती शौचालये दुरुस्त करण्यात यावीत, असे म्हणणे मांडले जात आहे.
वडाळा, कुर्ला, गोवंडी, देवनार, मानखुर्द, मालाड, मालवणी, वांद्रे, भांडूपसह लगतच्या चाळी आणि झोपड्यांमध्ये शौचालये असली तरी ती नादुरुस्त स्वरूपात असतात किंवा अस्वच्छ असतात. याव्यतिरिक्त मल वाहून नेणा-या वाहिन्यादेखील नादुरुस्त स्वरूपात असतात. त्यामुळे या अस्वच्छतेचीदेखील यात भर पडते. एल वॉर्ड, एम, एन वॉर्डसह पश्चिम उपनगरातील बहुतांश झोपड्यांमध्ये ही समस्या आहे. लोकप्रतिनिधीदेखील याकडे कानाडोळा करत आहेत. मुळात मल वाहून नेणाऱ्या छोट्या आणि मोठ्या वाहिन्यादेखील तुंबलेल्या असल्याने त्यांच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. जुन्या इमारतींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर असून, दाट वस्तीमध्ये नागरिकांना अशा प्रकाराच्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. मुंबई महापालिका किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींकडे याबाबत तक्रार केली तरी तात्पुरती स्वच्छता केली जाते. त्यामुळे समस्या कायमची निकाली लागत नाही. परिणामी, नवी शौचालये बांधण्यापूर्वी जुन्या शौचालयांची दुरुस्ती करावी, असे म्हणणे प्रामुख्याने दाट लोकवस्ती असलेल्या परिसरांतून मांडले जात आहे.
---------------
मुंबईमध्ये अद्यापपर्यंत ७ हजार २१२ शौचालयांमध्ये ८७ हजार ४२२ शौचकुपे वापरात आहेत, तर हगणदारीमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिका १ हजार १६८ सामुदायिक शौचालये बांधणार आहे.
मुंबई शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागामार्फत एकूण १ हजार १६८ सामुदायिक शौचालयांमध्ये २२ हजार ७७४ शौचकुपे बांधणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १३९ सामुदायिक शौचालयांमध्ये २ हजार ८२० शौचकुपे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत, तसेच ५७७ सामुदायिक शौचालयांमध्ये १३ हजार ९९८ शौचकुपे बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
---------------
सार्वजनिक शौचालय
सार्वजनिक शौचालयातील ४ पैकी केवळ १ शौचालय स्त्रियांसाठी, असे प्रमाण २०१८ मध्ये दिसून आले.
१००-४०० पुरुषांसाठी १ आणि १००-२०० महिलांसाठी १ या प्रमाणात शौचालये पाहिजेत.
एका सार्वजनिक शौचालयाचा वापर ६९६ पुरुष करतात.
एका शौचालयाचा वापर १ हजार ७६९ महिला करतात.
२०१५ : शौचालय आणि...
२८ टक्के शौचालये पाइपद्वारे मलनिस्सारणाच्या व्यवस्थेशी जोडलेली होती.
७८ टक्के शौचालयांतील नळजोडणीबाबत सुस्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती.
५८ टक्के शौचालयांमध्ये वीज नव्हती.
---------------
हे नागरिक झोपडपट्टी/वस्त्यांमध्ये राहत आहेत.
अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, विले पार्ले - ४९ टक्के
मालाड, मालवणी - ५४ टक्के
कांदिवली ५८ - टक्के
देवनार, गोवंडी, मानखुर्द - ३० टक्के
भांडूप - ७२ टक्के
वांद्रे पश्चिम - ३९ टक्के
सायन, किंग सर्कल, दहिसर, कांदिवली, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला - ५० टक्के
---------------
वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत एकूण प्रस्तावित शौचकुपे २२ हजार ७७४ असून, त्यापैकी ८ हजार ६३७ नवीन शौचकुपे आहेत, तर १४ हजार १३७ जुन्या शौचकुपांचे पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी २० हजार ३०१ शौचकुपे बांधण्याचे उद्दिष्ट आहे, तर ४ हजार ५९६ शौचकुपे बांधून पूर्ण झाली आहेत. १५ हजार ७०५ शौचकुपांचे बांधकाम सुरू आहे.