Join us

चित्रकलेच्या संमेलनासाठी बजेटमध्ये तरतूद - विनोद तावडे यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 02:50 IST

बॉम्बे आर्ट सोसायटी ही संस्था समस्त कलाकारांची पंढरी आहे. या संस्थेकडून कला टिकविण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी कायम विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर संस्थेने चित्रकलेचे संमेलन आयोजित केल्यास, त्यासाठी निश्चितच राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येईल.

मुंबई : बॉम्बे आर्ट सोसायटी ही संस्था समस्त कलाकारांची पंढरी आहे. या संस्थेकडून कला टिकविण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी कायम विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर संस्थेने चित्रकलेचे संमेलन आयोजित केल्यास, त्यासाठी निश्चितच राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येईल. यंदाच्या अर्थसंकल्पातच या तरतुदीचा समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२६व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी द बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कामत, अनिल नाईक आदी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार डॉ. जे. एस. खंडेराव यांना ‘रूपधर जीवनगौरव’ पुरस्काराने विनोद तावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, तसेच अभिनेता मनोज जोशी, पद्मश्री सुधारक ओलवे, प्रा. नरेंद्र विचारे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तावडे म्हणाले, कला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांची यादी बॉम्बे आर्ट सोसायटीने आमच्याकडे द्यावी. त्याची दखल राज्य सरकार घेईल. त्यांचा सन्मान राज्य सरकारतर्फे करण्याचा आदेश लवकरच काढण्यात येईल.वासुदेव कामत म्हणाले, राज्य सरकार ज्या आत्मीयतेने नाटक, साहित्य या क्षेत्राकडे पाहते, त्याच आत्मीयतेने त्यांनी चित्रकला, शिल्पकलेकडेही पाहावे. जसा त्या कलांना राज्य सरकारचा आर्थिक पाठिंबा मिळतो, तसेच आमच्या कलेलाही पाठिंबा मिळावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. या संस्थेने अभिव्यक्त केलेली कलाकृती नेहमी वरच्या स्तरावर राहिलेली आहे. कलाकाराच्या खांद्यावर झोळी असते, ती भिकेची नसून वैराग्याची असते. कलाकार स्वत:साठी मागत नसतोतर तो सर्व कलाकारांसाठी, कलाक्षेत्रासाठी मागत असतो, असे कामत यांनी नमूद केले.

टॅग्स :विनोद तावडेमुंबई