Join us  

कल्याण-कर्जत-कसारा दरम्यान सर्व स्थानकावर लोकल थांबा द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 6:50 PM

रेल्वे प्रशासनाने कल्याण-कर्जत-कसारा या दरम्यान सर्व स्थानकावर लोकल थांबा द्यावा,  अशी मागणी प्रवासी संघटनेनी केली आहे.

 

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे मार्गावर लोकल धावत आहे. मात्र या लोकल कल्याण-कर्जत-कसारा दरम्यान ठराविक स्थानकांवर थांबत आहेत. परिणामी, दिव्यांग कर्मचारी, सामान्य कर्मचारी यांना ठराविक स्थानक गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याचा जास्त त्रास दिव्यांग कर्मचाऱ्यांना होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने कल्याण-कर्जत-कसारा या दरम्यान सर्व स्थानकावर लोकल थांबा द्यावा,  अशी मागणी प्रवासी संघटनेनी केली आहे.

राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि दहिसरपासून विरारपर्यंत सर्व स्थानकांवर थांबा आहे. हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी, वडाळा, मानखुर्द, वाशी, जुईनगर, नेरूळ, बेलापूर, पनवेल या निवडक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 

तर, मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलूंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा आणि अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. कल्याण ते कसारा या दरम्यान फक्त टिटवाळा, आसनगाव, कसारा या स्थानकावर थांबा दिला आहे. यामुळे खर्डी, वाशिंद, आंबिवली, शहाड येथील कर्मचाऱ्यांना रिक्षा किंवा इतर पर्यायी वाहन वापरून लोकल थांब्याचे स्थानक गाठावे लागते. यात जादा पैसे आणि वेळ वाया जातो. दिव्यांग कर्मचाऱ्यांना हा प्रवास करताना अनेक अडचणी येतात. तसेच, कल्याण ते कर्जत दरम्यान लोकल अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत येथे थांबा दिला आहे. यामुळे भिवपुरी, शेलू, वांगणी, उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथील कर्मचारी वर्गाला लोकल असून देखील वेळेत प्रवास होत नाही, असे म्हणणे प्रवासी संघटनेकडून मांडण्यात आले. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सुरु केली आहे. कल्याण-कर्जत-कसारा दरम्यान प्रत्येक स्थानकांवर लोकल थांबली पाहिजे. कल्याण पुढे प्रत्येक स्थानकावर मोठ्या संख्येने कर्मचारी राहत आहेत. यामध्ये दिव्यांग प्रवासीही आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने लोकल थांब्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारेल्वेमुंबई