आधी पायाभूत सुविधा द्या; मगच ‘स्मार्ट’ व्हा
By Admin | Updated: November 21, 2015 00:55 IST2015-11-21T00:55:05+5:302015-11-21T00:55:05+5:30
ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या दिशेने जोरदार पावले उचलण्यास सुरुवात केली असताना त्यांच्या या योजनेत कोलदांडा घालण्याचे काम सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरू केले आहे.

आधी पायाभूत सुविधा द्या; मगच ‘स्मार्ट’ व्हा
ठाणे : ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या दिशेने जोरदार पावले उचलण्यास सुरुवात केली असताना त्यांच्या या योजनेत कोलदांडा घालण्याचे काम सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरू केले आहे. आधी पायाभूत सुविधा द्या आणि मगच स्मार्ट सिटीचे दिव्य स्वप्न दाखवा, असा सूर शुक्र वारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावला. तसेच स्मार्ट सिटीसंबंधी नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी प्रशासनाने नगरसेवकांकडे अर्ज दिले. मात्र, त्यास नगरसेवकांनी स्पष्ट नकार देऊन अधिकारी-कर्मचारीस्तरावर ही कामे करण्याचा सल्ला दिला. यामुळे महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात स्मार्ट सिटीच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादात ठाणेकरांचे असलेले स्मार्ट सिटीचे स्वप्न आता अधुरे राहते की काय, अशा शंका उपस्थित होत आहेत. केंद्र तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीत ठाणे शहराचीही निवड झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी ठामपाने विविध संकल्पना, विविध प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी ‘स्मार्ट’ पावलेही उचलली आहेत. याशिवाय, स्मार्ट सिटीसंबंधी नागरिकांच्या सूचनाही जाणून घेण्यासाठी एक कार्यक्र मही प्रशासनाने नुकताच घेतला. त्यातही आधी पायाभूत सुविधा द्या, मगच स्मार्ट सिटी करा, असा सूर नागरिकांनी लावून महापालिकेच्या कारभारावर टीका केली होती. दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेसंबंधी चर्चासत्र तसेच विविध प्रकल्प आखताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. मनपाचा संपूर्ण कारभार प्रशासनामार्फत एकतर्फी चालविण्यात येतो, अशी खंतही नगरसेवक व्यक्त करतात. असे असतानाच विविध प्रस्तावासंबंधीच्या नस्ती (फाइल) माहिती अधिकारात नगरसेवकांना देण्यासंबंधी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिपत्रक काढले होते. त्यामुळे नगरसेवकांमध्ये खदखदत असलेल्या असंतोषामध्ये भरच पडली आणि यातूनच शुक्र वारच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीकेचे आसूड ओढले. पुरेशा पायाभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून कशाच्या आधारावर स्मार्ट सिटीचे अर्ज भरून घ्यायचे, असा सवाल करून ते भरण्यास नगरसेवकांनी स्पष्ट नकार दिला. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी क्षेपणभूमी नाही, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि निधीअभावी प्रभागातील कामे खोळंबली आहेत. त्यामुळे आधी पायाभूत सुविधा द्या, मगच स्मार्ट सिटीचे दिव्य स्वप्न दाखवा, असा सूर सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावला.