Join us  

फी, शिक्षक, सुविधांची माहिती मोफत उपलब्ध करून द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:42 AM

विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारच्या सूचना.

मुंबई : महाविद्यालयांची फी, शिक्षकांची संख्या, शैक्षणिक-भौतिक सुविधांची माहिती ऑनलाईन किंवा छापील स्वरूपात उपलब्ध करून देताना त्याकरिता कोणतेही शुल्क आकारू नये, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून प्रवेश सुरू होण्याच्या किमान ६० दिवस आधीच महाविद्यालयासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध करून देणे कॉलेजांना बंधनकारक करण्यात आले आहे. 

त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक टळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या अनुषंगाने संस्थेने काय केले याची माहिती देणे संस्थांवर बंधनकारक असेल. उदा. आंतर विद्याशाखा अभ्यासक्रम, क्रेडिट पद्धती लागू केली आहे का? कोणती माहिती उपलब्ध करून द्यायची याची यादीच विभागाने दिली आहे.

वर्गांची संख्या, आकार, प्रयोगशाळा, कॅण्टीन, वसतिगृह, इंटरनेट सुविधा, इनोव्हेशन सेल, संगणक प्रयोगशाळा, अग्निसुरक्षा विषयक तरतुदी, क्रीडा विषयक सुविधा, डिजी लॉकर आदी.

 अभ्यासक्रम- प्लेसमेंटविषयीची माहिती

 अभ्यासक्रम - कुठले, प्रवेश क्षमता, पद्धती, प्रवेश परीक्षेची माहिती, तुकड्या किती, फी, गेल्यावर्षीचे कट ऑफ आदी.

 इंटर्नशीप-प्लेसमेंट – संधी कुठे, किती विद्यार्थ्यांना फायदा झाला, कॅम्पस प्लेसमेंटचे तपशील

प्राचार्यांचा नेहमीच   न...ना चा पाढा 

अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव आहे. ही माहिती छापील किंवा संस्थेच्या वेबसाईटवर राहणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधांशी पडताळणी करता येईल,’ अशी अपेक्षा एका विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. महाविद्यालयांनी मात्र आतापासूनच नन्नाचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. 

ही माहिती देणे बंधनकारक :

 शैक्षणिक संस्थेची इत्यंभूत माहिती (पत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल)

 संस्थेचे स्वरूप (अनुदानित, डीम्ड, खासगी, स्वयंअर्थसहाय्यित)

 गेल्यावर्षीचा अहवाल

 संस्थेची पाच वर्षांची विकास योजना

 एआयएसएचई कोड

 नॅक, एनबीए आदींचे रँक. 

 ट्रस्टचे नाव, सदस्य, पत्ते, छायाचित्रे आदी माहिती. 

 प्राचार्यांसह डीन, एचओडी आदींची माहिती, शैक्षणिक पात्रता. 

 महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य यांची माहिती. 

विद्यार्थी-शिक्षक प्रमाण किती. 

 आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य, करारांचे स्वरूप

शिक्षकांची माहिती :

विषयवार शिक्षक किती, संस्थेत कामाला सुरूवात कधी केली, नेमणुकीचे स्वरूप (कायम,कंत्राटी इत्यादी) त्यांची नावे, माहिती, युनिक आयडी, कामाचा अनुभव, संशोधन कार्य, उद्योगात कामाचा अनुभव, पीएच.डी.ची माहिती आदी.

टॅग्स :मुंबईविद्यार्थी