Join us  

या कानडी जोडप्याचा अभिमान वाटतो, मुंबई अन् आमची भाषा मराठीच 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:06 PM

चंपक मेहताच्या या विधानाचा पुन्हा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी निषेध नोंदविण्यात आला.

मुंबई - मुंबईची आमभाषा ही हिंदी आहे, या वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या निर्मात्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दम देण्यात आला होता. महाराष्ट्राची अन् मुंबईची आम आणि खास भाषा मराठीच असल्याचं सांगत, आपल्या वक्तव्यावर मराठी माणसांची माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर, मालिकेने नवीन व्हिडीओ जारी करत महाराष्ट्रातील मराठीजनांची माफी मागितली. त्यानंतर, आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कन्नडी भाषिकांचं मराठी प्रेम दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चंपक चाचा या व्यक्तिरेखेने मुंबईची भाषा हिंदी असून सुविचार हिंदीत लिहिला पाहिजे असं विधान केले होते. त्यावरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. या व्हिडीओत आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,’ असा एक संवाद बापूजी चंपक लाल या एपिसोडमध्ये म्हणताना दिसले. त्यावर मनसेचे अमेय खोपकर यांनी नेमक्या याच संवादावर आक्षेप घेत, ‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती तसेच यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

चंपक मेहताच्या या विधानाचा पुन्हा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी निषेध नोंदविण्यात आला. तसेच महाराष्ट्राची भाषा मराठी असून माफी मागा, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर, मालिकेच्या संबंधित कलाकारांनी माफीही मागितली. त्यामुळे हा मुद्दा तिथेच शांत झाला. आता, सोशळ मीडियावर एका कन्नड भाषिक जोडप्याचा फोटो व्हायरल होत आहे. या जोडप्याच्या हातात एक फलक दिसत असून आमची भाषा मराठीच असे ते म्हणत आहेत. आम्ही कानडी आहोत, पण आम्ही मुंबईत राहतो. म्हणून आमची भाषा मराठीच ! असे या जोडप्यानं म्हटलंय. मूळ कर्नाटक राज्यातील आणि कानडी मातृभाषा असलेलं हे जोडप कदाचित मुंबईत राहत आहे. मात्र, या जोडप्याचं मराठी प्रेम पाहून अनेकांनी त्यांच कौतुक केलंय. या जोडप्यास शुभेच्छाही दिल्या जात आहेत. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याचा फोटो व्हायरल होत आहे.  

टॅग्स :मुंबईकन्नडमराठीमनसे