विरोध अणुऊर्जेला नव्हे तर जैतापुरातील प्रकल्पाला
By Admin | Updated: May 19, 2015 00:28 IST2015-05-18T22:52:08+5:302015-05-19T00:28:13+5:30
अनंत गीते : दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा प्रकल्प रद्द होणे आवश्यक

विरोध अणुऊर्जेला नव्हे तर जैतापुरातील प्रकल्पाला
खेड : भूकंप आणि त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. देशातील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षितता धोक्यात आली असताना अणुऊर्जा प्रकल्प रद्द करणे आवश्यक होते. मात्र, तसे केले जात नाही. या प्रकल्पामुळे कोकण नष्ट होणार असल्याने हा अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाला पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे, अशा शब्दांत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी जैतापूरबाबत आपले मत व्यक्त केले.जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली़ खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेचा पुनरूच्चार केला़ भूकंप आणि त्सुनामीच्या पार्श्वभुमीवर फ्रान्स आणि जपानने आपले आगामी अणुऊर्जा प्रकल्प रद्द केल्याचे दाखलेही गीते यांनी यावेळी दिले़अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाल्याने विजेची गरज भागणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी छेडले असता कोळशातील गैरव्यवहारामुळे कोळसा खाणवाटप बंद पडले होते़ याचा मोठा फटका कोळशाच्या उपलब्धततेवर झाला. आता कोळसा खाणवाटप करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगत यामुळे कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होउन देशात कोळशावर मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन करणे शक्य होणार असल्याचे सुतोवाच केले.
याशिवाय अपारंपारिक वीजेतील सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जाकडे देशाला लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत याकरीता लागणारा कच्चा माल उत्पादनाच्यादृष्टीने आवश्यक असलेला प्रकल्प भंडारा येथे येत्या काही महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
रेल्वेचे दुपदरीकरण केल्यानंतर खेडमध्ये सर्वच रेल्वेच्या गाडयांना थांबा देणे शक्य होईल, असे सांगत सध्या थांबा देणे अशक्य असल्याचे सुतोवाच केले. यावेळी त्यांनी लोटे येथील प्रस्तावित असलेला पेपर मिल उद्योगाचे काम लवकरचा सुरू होणार असून त्याकरीता लागणारा कच्चा माल बांबू हा मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येणार आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना बांबूच्या विक्रीतून मोठे उत्पादन घेता येणार आहे. या उद्योगाला प्रतिवर्षी २० लाख टन बांबू लागणार आहे. बांबू आणि ऊसाची चिपाड यांना या उद्योगाकडून मागणी असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
गीते म्हणाले,
कोळसा खाणवाटपाचे आदेश देण्यात आल्याने कोळशावर वीजनिर्मिती शक्य.
सौरऊर्जा आणि पवन ऊर्जाकडे लक्ष देणे आवश्यक.
संघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही...!
कोकणातील शिवसेनेच्या नेतृत्वाबाबत विचारले असता रामदास कदमांचे नाव घेणे टाळत संघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही असे सांगितले़ यापुर्वीही आपल्यावर कोकणाची जबाबदारी होती आजही असली तरी संघटनेच्या मर्यादेप्रमाणे कार्यकर्त्याने राहीले पाहीजे अन्यथा त्याची उचलबांगडी केली जाईल अषी कोपरखळीही त्यांनी मारली़