टेकडीवरील संरक्षक भिंतीचे काम थांबविले
By Admin | Updated: December 25, 2014 23:04 IST2014-12-25T23:04:12+5:302014-12-25T23:04:12+5:30
पूर्व भागातील आंबेडकरनगर येथील टेकडी धोकादायक झाल्याने या टेकडीचा काही भाग कोसळण्याची भीती आहे.

टेकडीवरील संरक्षक भिंतीचे काम थांबविले
अंबरनाथ : पूर्व भागातील आंबेडकरनगर येथील टेकडी धोकादायक झाल्याने या टेकडीचा काही भाग कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या टेकडीला संरक्षित करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेले भिंत बांधण्याचे काम निकृष्ट साहित्याने होत असल्याने ते तत्काळ थांबविण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले. हे काम करणारा ठेकेदार भिंतीच्या कामासाठी मातीमिश्रित रेतीचा वापर करीत आहे. हा प्रकार स्थानिक नगरसेवक सदाशिव पाटील यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उघड केला. अखेर, नगराध्यक्षांनी हे काम तत्काळ थांबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आंबेडकरनगरमधील काही वस्ती ही एका मोठ्या टेकडीखाली वसली आहे. तर या टेकडीच्या उंचावरही अनेक घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, पावसाळ्यात पाणी झिरपल्याने ही टेकडी कोसळून अनेक घरे ढिगाऱ्याखाली येण्याची भीती होती. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी तत्काळ या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पालिकेने या भिंतीच्या कामाला मंजुरीही दिली. संरक्षक भिंतच निकृष्ट बांधल्यास टेकडीखाली राहणाऱ्यांना धोका कायम राहणार आहे. त्यामुळे काम चालू असताना नगरसेवकाने या रेतीचा नमुना घेऊन तो सभेत सादर केला. (प्रतिनिधी)