मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिंसा विश्व भारती संस्थेतर्फे ‘पर्यावरण संरक्षण, संवर्धन व प्रदूषण’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील एनएससीआय डोम येथे ५ जून रोजी हा कार्यक्रम होईल. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी पर्यावरणासाठी पहिल्यांदा विश्वविख्यात धर्मगुरू एकाच छताखाली येऊन मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, इशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव, पतंजली योगपीठाचे संस्थापक योग ऋषी रामदेव बाबा, ब्रह्मकुमारी परिवारातून डॉ. बीके शिवानी या उपस्थिताना मार्गदर्शन करतील.अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी या संदर्भात सांगितले की, ज्याप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढत असून बर्फ वितळत आहे आणि ओझोन वायूचा थर कमी होत चालला आहे. जर का ही अवस्था कायम राहिली, तर पृथ्वीवर प्राणिमात्रांचे जगणे मुश्कील होईल. दिल्लीमध्ये दिवाळीच्या दिवशी होत असलेल्या प्रदूषणामुळे एका दिवसात शंभर सिगारेटचा धूर फुप्फुसामध्ये जात असतो, तसेच देशभरातमध्ये पाण्याची टंचाई सुरू असून, स्थानिक लोक दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या समस्या आपल्याला चिंतेत टाकत आहेत. सर्व धर्मगुरूंचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी लोकांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावे. यासाठी अहिंसा विश्व भारती संस्थेच्या वतीने पर्यावरणाच्या संवर्धन, संरक्षण व प्रदूषणावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाच हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.प्रदूषणाबाबत लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक व्यक्ती आपले योगदान कसे देईल, यासाठी त्याला प्रोत्साहित करण्याचा मुख्य उद्देश या परिषदेचा आहे. कार्यक्रमाला येणारे पाच हजार लोक हे चार धर्मगुरूंचे मार्गदर्शन घेतील. त्यावेळी त्यांनी समाजात पर्यावरणदूत म्हणून काम करावे, तसेच जी व्यक्ती पर्यावरणासाठी काम करत असेल, त्यांचा सन्मान करून त्यांना जगासमोर आणण्याचे काम संस्था करणार आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व वनस्पती हे सजीव आहेत. यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. गरजेपेक्षा जास्त उपयोग करू नये. धरती माता ही आपल्या गरजा पुर्ण करू शकते, परंतु आपल्या वाढत्या इच्छा, लालच, आकांक्षा याची पूर्ती करू शकत नाही. पदार्थ समित असून, इच्छा असिम आहेत. त्यामुळे भोग आणि उपभोगाची सीमा असली पाहिजे. रस्त्यावर गाड्यांची संख्या इतकी वाढली आहे की, माणसांना रस्त्यावरून चालण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. वृक्षांची होणार कत्तल, वृक्ष लागवडीसाठी लोकांमध्ये जनजागृती अभाव आहे. या समस्या चांगल्या पद्धतीने तरुणांच्या समोर मांडल्या गेल्या, तर त्यातून बदल नक्कीच घडू शकतो, असेही आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी सांगितले.
पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी धर्मगुरू एकाच छताखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 04:40 IST