संरक्षित प्रजाती धोक्यात
By Admin | Updated: August 26, 2014 21:48 IST2014-08-26T21:40:31+5:302014-08-26T21:48:39+5:30
प्रदूषणाचा धोका : नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घ्यावा

संरक्षित प्रजाती धोक्यात
संदीप बोडवे-- मालवण -- सिंधुदुर्गातील देवगड, मालवण, वेंगुर्ला हे तालुके विपुल सागरी जैवविविधतेचे आश्रयस्थान आहे. येथे ३६७ सागरी वनस्पती व वन्यजीव प्रजाती आढळून येतात. यापैकी अनेक वर्ग १ मधील संरक्षित प्रजाती आहेत. यामध्ये जागतिक स्तरावर महत्त्व असणाऱ्या व्हेल, शार्क, डॉल्फीन, कासव, सागरी प्रवाळ आणि कांदळवन प्रजातींचा समावेश आहे. किनारपट्टीवरील सर्व उत्पादन क्षेत्रांकरिता जैवविविधता महत्त्वाचा घटक आहे. अतिरेकी मानवी हस्तक्षेत्रामुळे अलिकडच्या काळात येथील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणामुळे संरक्षित सागरी प्रजाती धोक्यात येत आहेत.
अनियंत्रित मासेमारी, वाढते पर्यटन आणि विविध घटकांकडून होणारे सागरी प्रदूषण यामुळे स्थानिक जैवविविधतेवर परिणाम दिसून येऊ लागला आहे. जैवविविधता टिकून रहावी, मासेमारी शाश्वत रहावी आणि लोकांना जैवविविधतेचे संवर्धन करताना अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने जीईएफ अनुदानित महाराष्ट्र शासन, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) आणि भारत सरकारच्या सहाय्याने जैवविविधता प्रकल्प राबविला जात आहे.
भारतात इस्ट गोदावरी (आंध्रप्रदेश) आणि सिंधुदुर्ग या दोनच ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प राबविला जात असल्याने जागतिक स्तरावर येथील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
प्रकल्पाच्या दरम्यान सागरी जैवविविधतेचा अभ्यास केला जात आहे. नव्या सागरी प्रजाती, प्रदूषणामुळे होणारे त्यावरील परिणाम अभ्यासले जात आहेत. तटीय क्षेत्रात आढळून येणाऱ्या जैवविविधतेमध्ये ३० प्रकारच्या संरक्षित वर्ग- १ च्या प्रजातींचा समावेश आहे. आॅलिव्ह रिडले, ग्रीन सी कासवे, स्पम व्हेल, हंपबॅक व्हेल, स्नबफिन डॉल्फीन, कॉमन, बॉटल नोझ, हंपबॅक डॉल्फीन, लिटील इंडियन फॉरपाइल्स (बुलिया), ब्लॅक टीपरीफ शार्क यासह अनेक सागरी प्रजातींची आतापर्यंत नोंद झाली आहे.
किंग्ज गार्डन व आंग्रिया बँक परिसरात टर्बिनिरीया मेसेन्टेरीना, पोरायटीज ल्युटीया, कॉसीनीरीया मॉनिलिज, सायफेस्ट्रीया मायक्रोथेरमा, सिफॅन, ब्लॅक व फायर अशा विविध कोरल्स, प्रवाळांच्या प्रजाती आढळून आल्याची नोंद झाली. या ठिकाणच्या प्रवाळ क्षेत्रांमध्ये २००९ नंतर प्रदूषणामुळे विपरीत परिणाम झाल्याचे निरीक्षण सेंटर फॉर कोस्टल अॅण्ड मरीन बायोडायवरसिटी (सीसीएमबी)च्या तज्ज्ञांनी नोंदवले. सीसीएमबीकडून २००९ नंतर २०१३ मध्ये या ठिकाणच्या प्रवाळ क्षेत्रांचा अभ्यास करण्यात आला होता.
समुद्रातील प्लास्टिक कचरा, जाळी, तेलाचे गोळे पोटात गेल्याने सागरी जीवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्गचे तटीय क्षेत्र आणि समुद्रातील आंग्रिया बँक परिसरातील दुर्मीळ जैवविविधता जपण्याची आवश्यकता आहे.
- मार्विन फर्नांडिस,
युएनडीपीचे सागरी संशोधक
धोरण ठरविणे आवश्यक
सिंधुदुर्गची सागरी जीवसृष्टी वाचविण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. सागरी प्रदूषणावर नियंत्रण येणे आवश्यक आहे.
जैवविविधता मंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वनविभाग व पर्यटन महामंडळाने एकत्रीत धोरण ठरविणे आवश्यक आहे.
तरच सागरावर होणारे हे जलप्रदूषण थांबविणे शक्य होणार आहे.