मुंबईत हॉटेल, मॉलच्या गच्चीवरील रेस्टॉरंट उघडण्याचा मार्ग मोकळा, आयुक्तांनी दिली प्रस्तावाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 07:00 AM2017-11-02T07:00:15+5:302017-11-02T07:00:44+5:30
भाजपाच्या विरोधामुळे गेली दोन वर्षे रखडलेल्या ‘गच्चीवरील रेस्टॉरंट’च्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी आपल्या अधिकारात मंजुरी दिली.
मुंबई : भाजपाच्या विरोधामुळे गेली दोन वर्षे रखडलेल्या ‘गच्चीवरील रेस्टॉरंट’च्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी आपल्या अधिकारात मंजुरी दिली. एकीकडे हा प्रस्ताव पालिका महासभेच्या पटलावर असताना आयुक्तांनी सुधारित धोरण आणून त्याच्या तत्काळ अंमलबजावणीचीही तरतूद केल्याने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वप्न अखेर साकार होत आहे. आता हॉटेल-मॉल्सच्या गच्चीवरील रेस्टॉरंट उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाइटलाइफची संकल्पना मांडणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत गच्चीवरील रेस्टॉरंटची मागणी लावून धरली. हा त्यांचा लाडका प्रस्ताव होता. मात्र २०१५ साली भाजपाने काँग्रेसला हाताशी धरून हा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत फेटाळला. भाजपाच्या या खेळीमुळे शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली होती.
परंतु या स्वप्नावर सहजासहजी पाणी फेरू देण्यास आदित्य तयार नव्हते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचे मत आजमावण्यास शिवसेनेने सुरुवात केली. भाजपा या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची शक्यता नसल्याने पालिका महासभेत हा प्रस्ताव आल्यास त्यावर मतदान होऊन शिवसेनेची फजिती होण्याची शक्यता होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी नुकतीच पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेटही घेतली होती. त्यानुसार गटनेत्यांच्या बैठकीत गटनेत्यांनी मांडलेल्या सूचनांचा समावेश करून सुधारित धोरण तयार केले आहे. या धोरणाला पालिका आयुक्तांनी आज प्रशासकीय मंजुरी दिली. आयुक्तांच्या अधिकारात हे धोरण लागू करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
मुंबईत ८०० ठिकाणी गच्चीवर रेस्टॉरंट असून त्यांच्यावर पालिकेने अनेकवेळा कारवाई केली. परंतु तरीही ते सुरूच असून पालिकेचा महसूल बुडत आहे़ त्यामुळे गच्चीवरील रेस्टॉरंटला परवानगी देण्याची मागणी हॉटेल मालकांकडून आली होती. ती मान्य झाली.
अशी मिळणार परवानगी
- व्यावसायिक इमारती, लॉजिंग-बोर्डिंगची सोय असलेली हॉटेल्स, मॉलची गच्ची.
- गच्चीवर एलपीजी गॅस सिलिंडर वापरून स्वयंपाक करता येणार नाही. मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन कुकिंगला परवानगी.
- छत्री, पत्रे अशा कोणत्याही पद्धतीने हा परिसर झाकता येणार नाही. मान्सून शेडही लावता येणार नाही.
- शेजारच्या इमारतींना आवाजाचा त्रास होता कामा नये.
- आग प्रतिबंधक सर्व यंत्रणा बसवून अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक.
- नियमांचा भंग केल्यास कोणत्याही नोटिसीशिवाय परवानगी रद्द केली जाईल.