Join us

मुंबई-ठाण्यातील रस्त्यांवर १५ स्वच्छतागृहांचे प्रस्ताव फक्त कागदावरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 05:34 IST

मोठे रस्ते, त्यावर फ्लायओव्हर, वाहनांची गर्दी, वेगवान प्रवास, टोलचा भार हे सगळे मुंबई-ठाण्यातील रस्त्यांवर आहे. पण, नैसर्गिक विधीसाठी आवश्यक असलेली शौचालये मात्र नाहीत.

मुंबई/ठाणे :  

मोठे रस्ते, त्यावर फ्लायओव्हर, वाहनांची गर्दी, वेगवान प्रवास, टोलचा भार हे सगळे मुंबई-ठाण्यातील रस्त्यांवर आहे. पण, नैसर्गिक विधीसाठी आवश्यक असलेली शौचालये मात्र नाहीत. जी काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत ती अपुरी आणि माहिती नसलेली. ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या ‘यंदा कर्तव्य आहे’, या उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांची स्थिती, सुरक्षा आणि सुविधा यांचा धांडोळा घेण्यात येत आहे. त्यात प्रवाशांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत आणि वाहनचालकांपासून ते वाहतूक पोलिसांपर्यंत सगळ्यांनी एकच सूर व्यक्त केला, तो म्हणजे अपुऱ्या प्रसाधनगृहांचा. एकीकडे मेट्रोच्या चकाचक प्रवासाच्या बाता मारत असताना या मूलभूत गरजेकडेच आपल्याकडील यंत्रणांचे कसे दुर्लक्ष झाले आहे, याचे भीषण वास्तव ढळढळीतपणे समोर येते.ठाणे शहराचा वेगाने विस्तार होतो आहे. रस्ते आणि वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी ठाण्यातून प्रवास करताना तास- तासभर वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. परंतु रस्त्याच्या कडेला वाहन चालकांसाठी किंवा महिलांसाठी महापालिका हद्दीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नाही. मध्यंतरी रस्त्यालगत १५ सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा विचार पालिकेने केला होता. मात्र तो कागदावरच राहिलेला आहे. ठाणे महापालिका हद्दीत ४२१ कि.मी.चे रस्त्याचे जाळे आहे. त्यात आता मिसिंग लिंकही पालिकेने विकसित केल्या. रस्त्याचे जाळे वाढत असून वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात दरवर्षी ८ ते १० टक्के नव्या वाहनांची भर पडते. तसेच ठाण्यातून मुंबई, वसई-विरार, भिवंडी, नाशिक, गुजरातकडे रस्ते जातात. या रस्त्यावर दूर-दूरपर्यंत सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. 

स्वच्छ शहर योजनेचा एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी ठाण्यात आनंदनगर ते कासार वडवली या भागात १५ स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव होता. खास करून महिलांना केंद्रस्थानी ठेवून याचा विचार झाला होता. बहुतेक वेळेस टीएमटीच्या बसची वाट पाहताना किंवा वाहतूक कोंडी झाल्यास महिलांना स्वच्छतागृहाची समस्या भेडसावते. अनेक वाहन चालक हे उघड्यावरच नैसर्गिक विधी करताना दिसतात. त्यामुळे टॉवर व कॉम्प्लेक्स उभे राहिलेल्या ठाण्यात पदपथावरून जाताना पादचाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. 

यासंदर्भात महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा विचार प्रशासनाने केला होता. मात्र त्या दिशेने प्रगती झाली नाही. अर्थात कोरोनाची परिस्थिती संपून वाहतूक पूर्ववत होत असल्याने, लोकांच्या सोयीकरिता १५ स्वच्छतागृहे उभारण्याचा विचार पुन्हा केला जाऊ शकतो.

नुसताच प्रस्ताव, निधीचा पत्ता नाही स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव पुरेशा जागा उपलब्ध न झाल्याने तसेच निधीअभावी मागे पडला. अनेकदा मोठे हाऊसिंग कॉम्प्लेक्स त्यांच्यासमोर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी करण्यास विरोध करतात. त्यामुळेही प्रवाशांना सोय उपलब्ध होत नाही. 

टॅग्स :रस्ते वाहतूकमुंबईठाणे