गिरगाव चौपाटीवर जेट्टीच्या बांधकामाचा प्रस्ताव गुंडाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST2021-02-05T04:33:13+5:302021-02-05T04:33:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बिर्ला क्रीडा केंद्राच्या इमारतीबाहेरील ४५०.१८ चौरस मीटरची मोकळी जागा मुंबई ट्रस्टला देता येणार नसल्याने ...

गिरगाव चौपाटीवर जेट्टीच्या बांधकामाचा प्रस्ताव गुंडाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बिर्ला क्रीडा केंद्राच्या इमारतीबाहेरील ४५०.१८ चौरस मीटरची मोकळी जागा मुंबई ट्रस्टला देता येणार नसल्याने अखेर पालिका प्रशासनाने गिरगाव चौपाटीवर जेट्टीच्या बांधकामाचा प्रस्ताव सूचना सुधार समितीमध्ये मागे घेतला. ही जागा जेट्टीच्या बांधकामासाठी देण्याची मागणी भाजपकडून केली जात होती. मात्र दोन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव शिवसेनेने बहुमताच्या जोरावर फेटाळला होता.
बिर्ला क्रीडा केंद्राच्या सहा हजार ४७२ चौरस मीटर जागेपैकी दोन हजार ७९१ चौरस मीटर जागेत केंद्राचे कार्यालय, सभागृह, तालीम कक्ष उभारण्यात आले आहेत. तर ४५० चौरस मीटर जागा जिल्हाधिकारी व राज्य शासन यांच्या मंजुरीसापेक्ष मुंबई पोर्ट ट्रस्टला हस्तांतरित करून उर्वरित ६०२२ चौरस मीटरची जागा महापालिकेकडे कायम राहील. तसेच इमारतीबाहेरील मोकळ्या जागेचा वाहनतळ म्हणून सामायिक वापर करण्यात येईल, याबाबतच्या ठरावात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता.
मात्र त्यावेळी शिवसेनेने विरोध करीत प्रस्ताव नामंजूर केला होता. तर १० फेब्रुवारी २०२० रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत प्रस्तावित जेट्टी मरीन ड्राईव्ह या मार्गाशी जोडण्यासाठी बिर्ला क्रीडा केंद्राच्या बाहेरील ४५० चौरस मीटर एवढी मोकळी जागा मुंबई पोर्ट ट्रस्टला देता येणार नाही, असे ठरल्याने प्रशासनाने हा प्रस्ताव शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनाने मागे घेतला. त्यामुळे बिर्ला क्रीडा केंद्राची सुधारणा करून नाट्यगृह खुले करून देण्यात येणार आहे.