रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट मधील सूचना तातडीने मराठी भाषेत लावा; शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची सरकारकडे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 3, 2023 17:35 IST2023-03-03T17:34:52+5:302023-03-03T17:35:07+5:30
पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे या संदर्भात वृत्त लोकमतच्या दि,१ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाले होते.त्यामुळे मुंबईकर प्रवाशांनी जाहिर नाराजी व्यक्त केली .

रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट मधील सूचना तातडीने मराठी भाषेत लावा; शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची सरकारकडे मागणी
मुंबई : पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे या संदर्भात वृत्त लोकमतच्या दि,१ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाले होते.त्यामुळे मुंबईकर प्रवाशांनी जाहिर नाराजी व्यक्त केली असून लोकमतच्या कुजबुजची दखल घेत शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार विलास पोतनीस यांनी राज्य शासनाने सदरहू चूक तातडीने सुधारून सूचना मराठी भाषेत निर्देशित करण्याबाबत पश्चिम रेल्वेला सूचित करावे अशी मागणी केली आहे.
तसेच राज्यातील सर्व केंद्र शासकीय कार्यालयात इंग्रजी आणि हिंदीसह मराठी भाषेचा वापर करण्याबाबत दि. ५ डिसेंबर, २०२३ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणीकरण्याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सरकारकडे केली
असल्याची माहिती दस्तुरखुद्द आमदार पोतनीस यांनी लोकमतला दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मराठी भाषा गौरव दिन नुकताच राज्यभरात उत्साहात साजरा झाला. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जासाठी आपण उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जाऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली होती. मात्र पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडेच आहे. कारण कांदिवली रेल्वे स्थानकावर असलेल्या लिफ्टमध्ये प्रवाशांसाठी केलेल्या सूचना चक्क गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत निर्देशित केल्या आहेत. पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे असल्याचे गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी जागतिक मराठी दिनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे निदर्शनास आणले आणि सदर चूक सुधारण्याची आणि सदर सूचना मराठीत निर्देशित करण्याची मागणी केली होती.लोकमतच्या कुजबुज मध्ये सदर वृत्त प्रसिद्ध झाले होते.