उमेदवार करताहेत प्रचाराचे आॅडिट
By Admin | Updated: October 6, 2014 04:10 IST2014-10-06T04:10:24+5:302014-10-06T04:10:24+5:30
सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. प्रचारामध्ये त्रुटी राहू नयेत, यासाठी सर्व जण काळजी घेत आहेत.

उमेदवार करताहेत प्रचाराचे आॅडिट
नामदेव मोरे, नवी मुंबई
सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. प्रचारामध्ये त्रुटी राहू नयेत, यासाठी सर्व जण काळजी घेत आहेत. कार्यकर्ते प्रचार करताहेत का, हे पाहण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेकडून पाहणी करण्यात येत आहे.
नवी मुंबईमधील दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा व मनसे या पाचही प्रमुख पक्षांनी प्रथमच उमेदवार उभे केले आहेत. मतविभाजनाचा फटका बसू नये, यासाठी प्रमुख पक्षांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रचाराला वेग आला आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा प्रभागात थांबून घरोघरी जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभागांमध्ये नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी प्रचार करीत आहेत की नाही, हे तपासण्यासाठी त्रयस्थ व्यक्तींची व विश्वासू सहकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांचे हे दूत शहरात फिरून वस्तुस्थितीची माहिती देत आहेत.
शहरात पक्षाची ताकद कुठे चांगली आहे, कुठे पदाधिकारी चांगले काम करीत आहेत, विरोधकांचा प्रचार कसा सुरू आहे याचीही माहिती घेतली जात आहे. जिथे पक्ष कमकुवत वाटत आहे तेथील कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने काम करण्यास सांगितले जात आहे. कुठे प्रोत्साहन देऊन तर कुठे अधिकारवाणीने सांगितले जात आहे. प्रभागातील खरी माहिती जात असल्यामुळे कार्यकर्तेही जोमाने काम करू लागले आहेत. पक्षाचा वचननामा व इतर साहित्य घरोघरी जाते का याचीही माहिती घेतली जात आहे. वरिष्ठ पदाधिकारीही अचानक भेटी देऊन प्रचार कसा सुरू आहे, याची माहिती घेत आहेत.