प्रचारात भाडोत्री कार्यकर्ते
By Admin | Updated: April 19, 2015 00:18 IST2015-04-19T00:18:56+5:302015-04-19T00:18:56+5:30
निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना प्रामाणिक कार्यकर्त्यांची उणीव भासत असून पुरेसे कार्यकर्ते नसल्यामुळे रॅली व सभांसाठी पैसे देऊन गर्दी जमवावी लागत आहे.

प्रचारात भाडोत्री कार्यकर्ते
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना प्रामाणिक कार्यकर्त्यांची उणीव भासत असून पुरेसे कार्यकर्ते नसल्यामुळे रॅली व सभांसाठी पैसे देऊन गर्दी जमवावी लागत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत नाका कामगारांची मदत घेतली जात असून प्रचारासाठी दिवसाकाठी ३०० ते ८०० रुपये व दोन वेळचे जेवण द्यावे लागत आहे. तर सुशिक्षित तरुणांना अधिक रक्कम द्यावी लागत आहे.
घरची चटणी-भाकरी खाऊन नेत्यांचा प्रचार करण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. निवडणुकांमध्ये पैशांची उधळपट्टी होत असून पैसा असेल त्यांनाच उमेदवारीही दिली जात आहे. व्यवहारवादी राजकारणात प्रामाणिक कार्यकर्ते उरले नसून त्याचा प्रत्यय महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांना येत आहे. १११ प्रभागांसाठी तब्बल ५६८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. चौक सभाही घेतल्या जात आहेत. प्रचारासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमत नसल्यामुळे अनेक उमेदवारांनी क्षमतेप्रमाणे चक्क भाडोत्री कार्यकर्ते बोलावले आहेत. झोपडपट्टी भागात एक वेळच्या प्रचारासाठी २०० व दिवसभरासाठी ३०० रुपये द्यावे लागत आहेत. शहरी भागात कार्यकर्त्यांना ३०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय दोन वेळचे जेवणही द्यावे लागत आहे. कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी दिसावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. अनेक उमेदवारांनी प्रभागामधील महिला व नागरिकच प्रचारामध्ये असावे यासाठी महिला बचत गट व इतर नागरिकांना विनंती केली आहे. त्यांना प्रचारासाठी पगार दिला जात आहे. विशेष म्हणजे रोजच्या रोज मोबदला दिला जात आहे. परीक्षा संपल्यामुळे विद्यार्थीही पैसेही मिळतात म्हणून मोठ्या संख्येने प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. प्रचारात तरुणांच्यामुळे उमेदवारांचाही उत्साह वाढला आहे. प्रामणिक कार्यकर्ते मिळत नाहीत. पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते मोजकेच काम करत असल्याचेही काहींनी सांगितले. अनेकांना प्रयत्न करूनही चांगले प्रचारक मिळेनासे झाले आहेत.
रविवारसाठी मागणी वाढली
१९ एप्रिल हा प्रचारासाठी शेवटचा रविवार आहे. सर्वच उमेदवारांनी रॅलींचे आयोजन केले आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी उमेदवारांनी रॅली व सभांसाठी गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. नाका कामगारांनाही मागणी वाढली असून कामगारांनीही दर वाढवले आहेत.
च्महापालिका निवडणुकीचा प्रचार रोजगार निर्मितीचे केंद्र बनले आहे. अनेक वेळा नाक्यावर दिवसभर बसूनही काम मिळत नाही. दिवसभर सिमेंट, विटा व इतर कष्टाचे काम करूनही ३०० ते ४०० रुपये मिळतात.
च्परंतु प्रचारामध्ये कमी कष्टात चांगले पैसे मिळत आहेत. याशिवाय दोन वेळचे जेवण व नाश्ताही मिळत आहे. यामुळे अनेक कामगारांनी कष्टाची कामे सोडून प्रचारासाठी जाण्यास प्राधान्य दिले असल्याचे कामगार सांगत आहेत.