छाया रुग्णालयाचे हस्तांतरण लांबणीवर
By Admin | Updated: June 19, 2015 00:01 IST2015-06-19T00:01:36+5:302015-06-19T00:01:36+5:30
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी पालिकेच्या छाया रुग्णालयाला भेट दिली. आ. डॉ. बालाजी किणीकर

छाया रुग्णालयाचे हस्तांतरण लांबणीवर
उल्हासनगर/अंबरनाथ : राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी पालिकेच्या छाया रुग्णालयाला भेट दिली. आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. मात्र, मंत्र्यांनी या हस्तांतरणालाच बगल दिल्याने अंबरनाथकरांची निराशा झाली आहे. तर दुसरीकडे हे रुग्णालय जीवंत राहावे अशी इच्छा व्यक्त करून मंत्र्यांनी आपला दौरा आटोपला.
स्वत:ची वैद्यकीय सुविधा पुरविणारी राज्यातील पहिली नगरपरिषद म्हणजे अंबरनाथ. छाया रुग्णालयाच्या स्वरूपात अंबरनाथ नगरपरिषदेने वैद्यकीय सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, आता ते चालविणे पालिका प्रशासनाला अवघड जात आहे. त्यामुळे तीन-चार वर्षांपासून ते राज्य शासनाच्या ताब्यात देऊन त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रयत्न आ. किणीकर हे करीत आहेत. त्यातच शनिवारी आरोग्यमंत्र्यांचा या रुग्णालयाला भेट देण्याचा कार्यक्रम ठरल्यावर ते शासनाच्या ताब्यात जाण्याचे स्पष्ट संकेत होते. मात्र, आरोग्यमंत्री सावंत यांनी हस्तांतरणाच्या विषयालाच बगल दिली. तसेच हे रुग्णालय सुरू ठेवण्यासाठी शासन आपल्या परीने योग्य तो प्रयत्न करेल, असे मोघम आश्वासन दिले. छाया रुग्णालय ताब्यात घेण्यासंदर्भात योग्य निर्णय न झाल्याने अंबरनाथकरांच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशाच आली आहे.
तत्पूर्वी सावंत यांनी प्रसूतिगृह रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करून संथगतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत नाराजी व्यक्त केली. ३१ जुलैपर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. (प्रतिनिधी)