लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नवमानवतावादाची डॉ. मानवेंद्र रॉय यांनी सांगितलेली २२ सूत्रे म्हणजे नवभारताच्या जडणघडणीचा आत्मा होता. नवमानवतावाद म्हणजे स्वावलंबन, स्वाभिमान, धर्मनिरपेक्षता, समता आणि समाजवादाचे अधिष्ठान आहे. म्हणूनच बहिणींनी लाडक्या न होता स्वाभिमानी सौदामिनी व्हायला पाहिजे, असे मत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विचार खंडांचे संपादक प्रा. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्राच्या माध्यमातून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘नवमानवतावादाचे आजचे स्वरूप’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी प्रा. लवटे म्हणाले की, घराघरात स्वाभिमानी सौदामिनी जोपर्यंत तयार होणार नाही, तोपर्यंत भारतात परिवर्तन होणार नाही. धार्मिक आणि आर्थिक गुलामगिरीतून बाहेर पडणे म्हणजे नवमानवतावाद. एकेकाळी राज्य सरकारमध्ये खूप समंजस आणि सुसंस्कृत मंडळी होती.
भारत अध्यात्ममुक्त व्हावा
हिंदू समाजात कोणाच्या घरी देव्हारा वा देव नाही अशी स्थिती नाही. जोपर्यंत समाजाची आणि देशाची उभारणी वैज्ञानिक निकषांवर होत नाही, भारताला अध्यात्ममुक्त करत नाही आणि योग्य अध्यात्म सांगत नाही तोपर्यंत मार्क्सवादातील दोष दुरुस्त करणारा सामाजिक परिवर्तन करणारा नवमतवाद पूर्ण होणार नाही, असेही प्रा. लवटे म्हणाले. तत्पूर्वी, सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्राचे डॉ. रमेश पोतदार यांनी प्रा. लवटे यांच्या कार्याची ओळख करून दिली. यावेळी सनदी अधिकारी नंदिनी आडे, तसेच महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा निर्मला सामंत प्रभावळकर उपस्थित होत्या.
तेव्हा समाज सुसंस्कृत होता
आताची परिस्थिती देवाच्या आळंदीला जाण्याऐवजी आपण चोराच्या आळंदीला चाललो आहोत अशी आहे. बुद्धिवादी माणसे जेव्हा समाजाचे नेतृत्व करतात तेव्हा समाज आणि राज्य सुसंस्कृत होते, असेही ते म्हणाले.