व्यावसायिकाला ऑनलाईन पिझ्झा पडला ६५ हजारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:06 IST2021-07-16T04:06:17+5:302021-07-16T04:06:17+5:30
खार मधील घटना खारमधील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गुगलवरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पिझ्झा मागविणे खारमधील ५९ ...

व्यावसायिकाला ऑनलाईन पिझ्झा पडला ६५ हजारांना
खार मधील घटना
खारमधील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुगलवरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पिझ्झा मागविणे खारमधील ५९ वर्षीय व्यावसायिकाला भलतेच महागात पडले आहे. या पिझ्झासाठी व्यावसायिकाला ६५ हजार रुपये गमाविण्याची वेळ ओढवली. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
खार परिसरात राहणारे तक्रारदार यांनी १२ जुलै रोजी सायंकाळी पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी गुगलवरून सर्चिंग सुरू केले. गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावरून पिझ्झा ऑर्डर केला. तेव्हा कॉल धारकाने दुसऱ्या क्रमांकावरून कॉल येणार असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात अन्य क्रमांकावरून कॉल येताच ठगाने मोबाईलवर लिंक धाडून त्यात माहिती भरण्यास सांगितले. त्यांनी माहिती भरून पाठवताच मोबाईल वर ओटीपी आला आणि खात्यातून २० हजार ९९ रुपये काढल्याचा संदेश धडकला. याबाबत विचारणा करताच चुकून पैसे काढल्याचा संदेश धडकला. पुढे आणखीन एक ओटीपी येत खात्यातून पुन्हा २० हजार रुपये कमी झाले.
थोड्यावेळाने आणखीन २० हजार ९९ रुपये वजा झाल्याने तक्रारदार वैतागले. त्यांनी, पैसे पाठवतो सांगून आणखीन एक मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितला. तेव्हा खात्यातून आणखीन ५ हजार रुपये कमी झाले. त्यातच बँकेतून त्यांना कॉल आला. कुठला व्यवहार सुरु आहे का? याबाबत विचारणा केली. त्यांनी नाही म्हणून सांगताच, बँकेने तत्काळ क्रेडिट खाते बंद केले. अशात खात्यातून एकूण ६५ हजार ३२२ रुपयांचे व्यवहार केल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत घड़लेला प्रकार सांगितला. त्यानुसार खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.