Join us  

अभियांत्रिकी क्षेत्रातून केवळ ४९ टक्के कुशल अभियंत्यांची निर्मिती; अहवालातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 5:54 AM

कुशल रोजगारनिर्मितीत अभियांत्रिकी क्षेत्र एमबीएनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

- सीमा महांगडेमुंबई : कुशल रोजगार निर्मितीमधील अभियांत्रिकी क्षेत्राचा दबदबा कमी झाला असून २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्षी त्यात ८.०९ % इतकी घट दिसून आली. २०२० च्या स्किल इंडिया अहवालानुसार, यंदा कुशल रोजगारनिर्मितीत अभियांत्रिकी क्षेत्राचा वाटा केवळ ४९ टक्के आहे. मागील वर्षी तो ५७.०९ टक्के होता. कुशल रोजगारनिर्मितीत अभियांत्रिकी क्षेत्र एमबीएनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.ब्रिजलॅब्ज सोल्युशन्स एलएलपी या भारतातील आयपीचलित इन्क्युबेशन लॅबने केलेल्या सर्वेक्षणानुसारही ७२% अभियंत्यांना या क्षेत्राची प्रचंड आवड असल्याने अभियांत्रिकी क्षेत्र निवडले. २१% जणांनी नोकरीची गरज असल्याने, तर ६ टक्क्यांनी जास्त पगारासाठी हे क्षेत्र निवडल्याचे नमूद केले. मात्र प्रत्यक्ष नोकरीसाठी अर्ज करताना अभियंत्यांसमोर सर्वांत मोठे आव्हान आत्मविश्वासाचा अभाव (५०%) होते. यात ३०% उमेदवारांनी योग्यता चाचणी उत्तीर्ण केली नव्हती आणि २०% उमेदवारांना या क्षेत्रातील कोडिंगच्या कामाचे पुरेसे ज्ञान नसल्याचे समोर आले. या कारणांचा सखोल अभ्यास करताना सहभागींनी आत्मविश्वासाच्या अभावाचे एकमेव सर्वांत मोठे कारण म्हणजे त्यांना अभ्यासक्रमादरम्यान प्रत्यक्ष अनुभव/प्रकल्पाभिमुख काम (४३%) करण्यासच मिळाले नसल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त २८% उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची कमतरता दिसून आली. २१% विद्यार्थ्यांनी जो अनुभव किंवा तंत्रज्ञान अवगत आहे ते आता कालबाह्य असून जुन्या अभ्यासक्रमाचा हवाला दिला, तर ९% जणांनी अभ्यासक्रमात तंत्रज्ञानावर कमी लक्ष दिल्याचे कारण पुढे केले. सर्वेक्षणाअंती पदवीधर अभियंत्यांपैकी केवळ ०.४% उमेदवार थेट रोजगारक्षम असल्याचे समोर आले.औद्योगिकसह, बाजार क्षेत्रात चांगली मागणी असल्याचे उघडकीस- रोजगार निर्मितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्र कमी पडत असले तरी औद्योगिक आणि बाजार क्षेत्रात अभियांत्रिकी क्षेत्रातीलच उमेदवारांची मागणी सर्वाधिक असल्याचेही या अहवालावरून समोर आले आहे.- पदवी (बीए, बीकॉम, बीएसस्सी), आयटीआय, पॉलिटेक्निक, एमबीए यापेक्षा अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतलेल्या सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के उमेदवारांना मागणी असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

टॅग्स :शिक्षण