मुंबई : निवासी आणि व्यावसायिक संकुलांतील ओल्या कचऱ्याची त्रयस्थ संस्थामार्फत वाहतूक करून तो इतरत्र नेऊन टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने कचऱ्याची त्रयस्थ संस्थांमार्फत वाहतूक करण्यावर बंदी घातली आहे. संबंधित संकुलांनी कचऱ्यावर जागच्या जागी प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी किंवा कचरा पालिकेकडे द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर)
डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. कचऱ्यावर संकुलातच प्रक्रिया करणाऱ्यांना मालमत्ता करातून सवलतही देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
घरगुती सॅनिटरी आणि हानीकारक कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. मोठ्या गृहसंकुलांनी या सेवेसाठी नोंदणी करून त्यांच्याकडील घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे वर्गीकरण करून तो पालिकेकडे सुपूर्द करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
२०२ टन सॅनिटरी, अन्य कचरा संकलित
या सेवेचा लाभ घेण्यासाठी आजवर तीन हजार ५३६ आस्थापनांनी नोंदणी केली आहे. त्यात दोन हजार ९१ गृहनिर्माण संस्था, एक हजार १४६ ब्युटी पार्लर, २८६ शैक्षणिक संस्था, ४० महिला वसतिगृहांचा समावेश आहे. या सर्व आस्थापनांकडून आतापर्यंत सुमारे २०२ टन घरगुती सॅनिटरी आणि हानीकारक कचरा संकलित केला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.