नाविकांच्या ‘एसआयडी’ नोंदणीची प्रक्रिया अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST2021-09-22T04:07:41+5:302021-09-22T04:07:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नाविकांना परदेशात सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एसआयडी’ अर्थात ‘सिफेरर्स आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट’च्या नोंदणीची सुरुवात सोमवारपासून ...

The process of ‘SID’ registration of sailors has finally started | नाविकांच्या ‘एसआयडी’ नोंदणीची प्रक्रिया अखेर सुरू

नाविकांच्या ‘एसआयडी’ नोंदणीची प्रक्रिया अखेर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नाविकांना परदेशात सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एसआयडी’ अर्थात ‘सिफेरर्स आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट’च्या नोंदणीची सुरुवात सोमवारपासून सुरू झाली. कोरोनाकाळात या प्रकियेला ब्रेक लागला होता.

नौवहन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नौकानयन मंत्रालयाकडून सीडीसी हे प्रमाणपत्र जारी केले जाते. त्याशिवाय कोणाही सिफेरर्सला क्रूझ किंवा जहाजावर सेवा देता येत नाही. परदेशात जाणाऱ्या सिफेरर्सना सीडीसीसोबतच पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे सोबत बाळगावी लागतात. त्यातील एखादे कागदपत्र हरवल्यास कित्येक महिने अडकून पडावे लागते. त्यावर उपाय म्हणून एसआयडी या अधिकृत ओळखपत्राचा पर्याय समोर आला. नोव्हेंबर २०१९पासून भारतात त्याची सुरुवात झाली. परंतु, २०२०मध्ये कोरोनामुळे या प्रक्रियेला ब्रेक लागला. मात्र, सहा महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

......

एसआयडी म्हणजे काय आहे?

एटीएमकार्डप्रमाणे दिसणाऱ्या ‘एसआयडी’मध्ये एक चिप असते. इमिग्रेशनला असलेल्या सिस्टीममध्ये हे कार्ड स्वाईप केल्यानंतर संबंधित नाविकाची संपूर्ण माहिती दिसते. त्यात इमिग्रेशन, पासपोर्ट आणि सीडीसीचा समावेश असतो. त्यामुळे सीडीसी किंवा पासपोर्ट हरवला तर नाविकांची परदेशात अडवणूक होणार नाही.

.....

या देशांत बंधनकारक

ब्राझील, युके, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह काही देशांनी एसआयडी बंधनकारक केले आहे. हळूहळू सर्व देश त्याची सक्ती करू लागल्यामुळे भविष्यात त्याची सर्वाधिक गरज भासणार आहे.

.....

वैधता किती? कुठे मिळते?

एसआयडीची वैधता १० वर्षे असते. मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट (एमएमडी) हे ओळखपत्र जारी करते. देशभरात दिल्ली, मुंबई, गोवा, चेन्नई, कोलकाता येथे त्याच्या पाच शाखा आहेत. हाताचे ठसे, शारीरिक खुणा आणि सिस्टम जनरेटेड फोटो त्यात समाविष्ट असतो. ते आधारकार्डशी लिंक असते. वैधता संपल्यावर पुन्हा नव्या कार्डसाठी अर्ज करावा लागतो. आधीचे एसआयडी जमा केल्यानंतरच नवे कार्ड मिळते.

......

बहुतांश कंपन्यांनी क्रूझवर काम करणाऱ्या नाविकांना एसआयडी बंधनकारक केले आहे. सहा महिने बंद असलेली नोंदणी कालपासून पुन्हा सुरू झाली. ज्यांनी आधी अपॉईंटमेंट घेतली होती आणि ती रद्द झाली, अशा नाविकांना प्राधान्य दिले जात आहे. नवीन अपॉईंटमेंट १ ऑक्टोबरपासून सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे नाविकांची कोंडी सुटण्यास मदत होईल.

- अभिजित सांगळे, कार्याध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स युनियन.

Web Title: The process of ‘SID’ registration of sailors has finally started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.