‘शालार्थ’मधील अडचणी दूर झाल्या!
By Admin | Updated: November 2, 2015 02:43 IST2015-11-02T02:43:22+5:302015-11-02T02:43:22+5:30
ठाणे, पालघर, रायगड, तसेच घोडेगाव (पुणे) प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासनमान्य अनुदानित आश्रमशाळांमधील शालार्थ प्रणालीच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्याची माहिती शिक्षक परिषदेने दिली

‘शालार्थ’मधील अडचणी दूर झाल्या!
मुंबई : ठाणे, पालघर, रायगड, तसेच घोडेगाव (पुणे) प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासनमान्य अनुदानित आश्रमशाळांमधील शालार्थ प्रणालीच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्याची माहिती शिक्षक परिषदेने दिली. त्यामुळे आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळणार असल्याचा दावा परिषदेने केला आहे.
शालार्थमधील अडचणींबाबत शिक्षक परिषदेने आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त मिलिंद गवादे यांच्या कार्यालयात धडक दिली. त्यात परिषदेने शासनमान्य अनुदानित आश्रमशाळांच्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला. ठाणे, पालघर, रायगड, तसेच घोडेगाव (पुणे) विभागातील शासनमान्य अनुदानित आश्रमशाळांमधील शेकडो शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन मागील अनेक महिन्यांपासून वेळेवर मिळत नसल्याचे परिषदेने सांगितले, तसेच शहापूर प्रकल्पातील सुमारे १४ शाळांमधील शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन एक महिना उशिरा जमा झाल्याची तक्रारही परिषदेने केली. त्यावर अप्पर आयुक्त कार्यालयाने शालार्थ प्रणालीत आलेल्या सर्व अडचणी दूर केल्याचे सांगितले, शिवाय मुख्याध्यापक पदांना तातडीने मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन दिले. इतर मागण्या आठ दिवसांत सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचा दावा परिषदेने केला आहे.