खारघरला समस्यांचा विळखा
By Admin | Updated: December 26, 2014 00:09 IST2014-12-26T00:09:56+5:302014-12-26T00:09:56+5:30
सिडकोचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून उभारण्यात आलेल्या खारघर उपनगराला विविध समस्यांचा विळखा पडला आहे.

खारघरला समस्यांचा विळखा
नवी मुंबई : सिडकोचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून उभारण्यात आलेल्या खारघर उपनगराला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. त्याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नादुरुस्त रस्ते, कचऱ्याचा प्रश्न, अर्धवट नालेसफाईमुळे गटाराचे पाणी रस्त्यावर वाहणे आदी विविध प्रकारच्या गंभीर समस्या येथील रहिवाशांना भेडसावत आहेत. तसेच रस्त्यावरील उघड्या मेनहॉलमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. सेक्टर ८ आणि १० या विकसित परिसरांतील गटारांची कामे अर्धवट आहेत.
अनेक ठिकाणी गटारावरील झाकणेच गायब झाली आहे. तर अलीकडेच केलेल्या गटारांचे कामही निकृष्ट झाले आहे. येथील ‘लिटल वर्ल्ड मॉल’समोर असलेला मुख्य नाला बंदिस्त करण्याची रहिवाशांची जुनी मागणी आहे. शिवसेनेचे उपविभागप्रमुख रामचंद्र देवरे यांनी सिडकोचे सहाय्यक अभियंता धनंजय माने यांना अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मात्र प्रत्येक वेळी आर्थिक व तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेऊ, अशी उत्तरे सिडकोच्या संबंधित विभागाकडून नागरिकांना दिली जात आहेत. या प्रकारामुळे शहरात अस्वच्छता वाढली आहे. डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे साथीचे रोग बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खारघर शहरामध्ये करोडो रुपये खर्चून उभारलेले अनेक प्रकल्प आहेत. मात्र आरोग्य सेवेकडे सिडको फारसे लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरामधील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सेक्टर १२, २१ , ८, ५, १० व १८ या ठिकाणी मुख्य रस्त्यावरच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी पथदिवे बंदच असतात.
सकाळी व्यायाम करण्यासाठी जाणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो . शहरात कचरा वेळेवर उचलला जात नसून खड्ड्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. दरम्यान, खारघर येथील सिडकोचे प्रशासक प्रदीप डहाके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. (प्रतिनिधी)