पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात
By Admin | Updated: November 25, 2015 02:41 IST2015-11-25T02:41:07+5:302015-11-25T02:41:07+5:30
मुस्लीम व दलित लोकसंख्या असलेल्या मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत

पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात
जमीर काझी, मुंबई
मुस्लीम व दलित लोकसंख्या असलेल्या मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. या मतदारसंघातील मूलभूत समस्या बऱ्यापैकी मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रामुख्याने या ठिकाणी भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नव्याने बसविण्यात आलेल्या पाइपलाइनमुळे नव्या ‘इनिंग’च्या पहिल्या वर्षात ८० टक्के संपुष्टात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या राजधानीतील मतदारसंघ असूनही या ठिकाणी ग्रामीण भागाप्रमाणे पाणी, वीज व रस्त्यांची प्रमुख समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. कष्टकरी व मध्यमवर्गीय नागरिकांचा भरणा असलेला हा मतदारसंघ विकासापासून वंचित होता. मात्र या ठिकाणी आमदार निधीतून प्रमुख समस्या मार्गी लावत असल्याचे आझमी यांनी सांगितले. त्यामध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर, बैंगनवाडी, गौतमनगर, मंडाला या ठिकाणी पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन बसविण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न ८० टक्के मिटला आहे. या ठिकाणच्या दोन हजार झोपडपट्ट्यांना मान्यता मिळाली असली तरी त्यांना अद्याप पाणी, विजेची पूर्तता झालेली नाही. त्यांना स्वतंत्र कनेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारसंघातील रस्ते अत्यंत निकृष्ट होते, गेल्या वर्षभरात रस्ते चांगले बनविण्यात आले आहेत. शिवाजीनगर हायस्कूल क्रमांक-२ चा पुनर्विकास केला आहे. आदर्शनगर, रफिकनगर या ठिकाणी, शौचालय, नाले व गटारांची दुरवस्था असल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. या ठिकाणी नवीन गटारी बसविण्यात आल्याने नागरिकांची ही समस्या मिटली आहे. कमलानगर, गौतमनगर व ९० फूट रस्त्यावरील मतदारसंघात येत असलेल्या ठिकाणचे रस्ते बनविण्यात आलेले आहेत. राज्य सरकार विरोधात असले तरी आपण या भागातील विकासाच्या कामासाठी सातत्याने मंत्री, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत आहोत. सरकारी अनास्थेमुळे विकासाच्या कामात विलंब होत असला तरी त्याची पूर्तता करून घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अबू आझमी यांनी सांगितले.