नियमांच्या कटकटीवर ‘प्रो-गोविंदा’चा उतारा!
By Admin | Updated: September 7, 2015 01:07 IST2015-09-07T01:07:17+5:302015-09-07T01:07:17+5:30
अस्सल मातीतील ‘कबड्डी’सारख्या खेळाला ‘प्रो-कबड्डी’चे वलय येताच ग्लॅमरस लूक आला. त्याचप्रमाणे आता नियमांच्या कटकटीतून सुटण्यासाठी लवकरच ‘प्रो-गोविंदा’चा उतारा काढण्यात येणार आहे

नियमांच्या कटकटीवर ‘प्रो-गोविंदा’चा उतारा!
मुंबई: अस्सल मातीतील ‘कबड्डी’सारख्या खेळाला ‘प्रो-कबड्डी’चे वलय येताच ग्लॅमरस लूक आला. त्याचप्रमाणे आता नियमांच्या कटकटीतून सुटण्यासाठी लवकरच ‘प्रो-गोविंदा’चा उतारा काढण्यात येणार आहे. साहसी खेळ आणि उत्सवाचे धोरण या वादंगात अडकलेला उत्सव रविवारी ‘कसाबसा’ साजरा झालेला असला तरी लवकरच ‘प्रो-गोविंदा’साठी आयोजक आणि राजकीय
नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली
आहे.
राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या घोषणेनंतर ‘प्रो-गोविंदा’च्या चर्चांना उधाण आले आहे. कबड्डीप्रमाणेच मोठमोठ्ठाले पुरस्कर्ते, राजकीय नेते, विविध संघ, प्रशिक्षक, गुणांकन पद्धत आणि ब्रँड अॅम्बेसेडर अशा ग्लॅमरस लूकमध्ये हा ‘प्रो-गोविंदा’ सर्वांच्या भेटीस येईल. लवकरच सुरू होणाऱ्या या ‘प्रो-गोविंदा’मुळे न्यायालयाच्या निर्बंधांना मात्र बासनात गुंडाळून ठेवावे लागणार आहे. उत्सवाचे राजकारण करत गोविंदाचे ‘लोणी’ पळविणारे नेते स्वत:चा ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी या ‘प्रो-गोविंदा’चा फायदा करून घेतील यात शंका नाही.
मात्र आता यासाठी भविष्यात नेमकी कोणती यंत्रणा अंतिम नियमावली तयार करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, ‘प्रो-गोविंदा’च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दहीहंडी उत्सव आॅलिम्पिकडे वाटचाल करत क्रीडा क्षेत्रात स्थान मिळवणार की केवळ न्यायालयाच्या निर्देशांपासून सुटका करून घेण्याचा हा पर्याय असणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. (प्रतिनिधी)