Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रुग्णालयातील सफाई व्यवस्थेचे खासगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 00:43 IST

मुंबई : महापालिका रुग्णालयातील स्वच्छता आता खासगी ठेकेदारांच्या हातात सोपविण्यात आली आहे. खासगीकरणाच्या या प्रस्तावाला नुकताच स्थायी समितीने हिरवा ...

मुंबई : महापालिका रुग्णालयातील स्वच्छता आता खासगी ठेकेदारांच्या हातात सोपविण्यात आली आहे. खासगीकरणाच्या या प्रस्तावाला नुकताच स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिवडीचे क्षयरोग रुग्णालय, वडाळा येथील कुष्ठरोग रुग्णालय, परळचे नेत्र रुग्णालय, सात रस्त्याचे कस्तुरबा रुग्णालय आणि फोर्टचे नाक-कान-घसा रुग्णालय या ठिकाणी ठेकेदारांच्या कामगारांमार्फत सफाई होणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांमार्फत मुंबईतील रुग्णालये व अन्य कार्यालयांची सफाई होत असते. तर पालिका मुख्यालय, विभाग कार्यालय आणि शाळांची सफाई खासगीकरणातून केली जाते. त्याप्रमाणे पालिकेच्या रुग्णालयांचीही खासगी संस्थेमार्फत सफाई करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता.

याबाबत घनकचरा विभागाने स्थायी समितीला पाठविलेल्या अभिप्रायात पाच रुग्णालयांची स्वच्छता खासगीकरणातून केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदारांची नियुक्ती करून जागेचे क्षेत्रफळ व त्याचा प्रतिमहिना दर, या तत्त्वानुसार ठेकेदार नेमण्यात येत आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मात्र खासगीकरणाच्या धोरणामुळे सफाई कामगारांच्या भरतीवर निर्बंध येईल, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. तसेच रुग्णालयाबाहेरचा परिसर स्वच्छ केला जात असला तरी शौचालयांच्या सफाईचे काय, असा सवाल नगरसेवकांकडून होत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका बजेट २०१८हॉस्पिटल