५० चौकांचा खासगीकरणातून विकास
By Admin | Updated: September 5, 2015 22:17 IST2015-09-05T22:17:58+5:302015-09-05T22:17:58+5:30
शहरातील विद्रुप झालेल्या चौकांच्या सुशोभीकरणाचा खर्च करणे पालिकेला अशक्य झाल्याने आता त्यावर पालिकेने रामबाण उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार, शहरातील चौकांचे आता

५० चौकांचा खासगीकरणातून विकास
ठाणे : शहरातील विद्रुप झालेल्या चौकांच्या सुशोभीकरणाचा खर्च करणे पालिकेला अशक्य झाल्याने आता त्यावर पालिकेने रामबाण उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार, शहरातील चौकांचे आता जाहिरातींच्या मोबदल्यात सुशोभीकरण करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये पालिकेने तीन श्रेणी केल्या असून पहिल्यात पालिकेच्या मालकीच्या, दुसऱ्या श्रेणीत एमएसआरडीसीच्या ब्रीजखालील जागा आणि तिसऱ्या श्रेणीत सॅटीसरातील स्पॉट विकसित केले जाणार आहेत. दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे कामही संबंधित संस्थेला दिले जाणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत ५० चौक असून १८ डिव्हायडर आहेत. ते १५ हजार स्क्वेअर मीटरमध्ये विकसित असून त्यांची लांबी १८ किमीपर्यंत आहे. परंतु, यातील अनेक चौकांची अवस्था दयनीय असून काही ठिकाणी फाउंटन नादुरुस्त तर काही ठिकाणी त्यांच्या भिंती कोसळलेल्या अवस्थेत आहेत. परंतु, एखादा चौक दुरुस्त करायचा झाल्यास सुमारे ५० ते ६० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याने त्याची दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट करून आपले हात वर केले होते. त्यामुळे आता हे चौक जाहिरातींच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत पटलावर ठेवला आहे. यानुसार, पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. यानुसार, पहिल्या श्रेणीत शहरातील मासुंदा, कळवा नाका, कोर्ट नाका आदींसह शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. परंतु, त्याच्याजवळील जागा जाहिरातींसाठी खुली ठेवली जाणार आहे. परंतु, ती राखली जात नसेल तर तत्काळ त्यांचा करारनामा रद्द करण्यात येणार आहे.
रोड डिव्हायडरही होणार विकसित...
शहरातील रोड डिव्हायडरही आता विविध रंगछटांनी रंगणार असून काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडून तर काही ठिकाणी संस्थांकडून रंगरंगोटी केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्राचीन कला जिवंत ठेवण्यासाठी काही ठिकाणी वारली पेंटिंगही केले जाणार आहे.
शहरातील काही महत्त्वाचे चौक
तीनहात नाका, गोल्डन डाइज, कापूरबावडी, खोपट, कोर्ट नाका, क्रीक जंक्शन, कामगार रुग्णालय, गांधीनगर जंक्शन, कळवा शिवाजी रुग्णालय, मुंब्रा बायपास, चिंतामणी जंक्शन, मीनाताई ठाकरे जंक्शन, तीन पेट्रोलपंप, खारेगाव, नितीन कंपनी
असे असतील शहरातील काही चौक
कळवा नाक्यावरील चौकात आता डान्सिंग थीम, चिंतामणी चौकात ढाण्यावाघ थीम, कोर्ट नाक्यावर न्यायालय प्रतिबिंबाची थीम आणि पालिका मुख्यालयाच्या आवारात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची थीम साकारेल.
उड्डाणपुलाखालच्या जागांचा कायापालट
ठाणे महापालिका हद्दीत विविध ठिकाणी आता उड्डाणपूल विकसित झाले आहेत. परंतु, त्याखालील जागेत अनधिकृत पार्किंग, गॅरेज सुरू आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलांची रया गेली आहे.
एकूणच आता काही ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक तर काही ठिकाणी दुकाने सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. काही ठिकाणी गार्डन, तर काही ठिकाणी बैठक व्यवस्था अथवा विरंगुळ्यासाठी छोटेखानी उद्याने विकसित करण्याचा
पालिकेचा मानस आहे.
यासंदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली असून त्यांनी याला तत्त्वत: मान्यता दिल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी भिंतींच्या ठिकाणी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणचाही विकास करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
तिसऱ्या श्रेणीत सॅटीसच्या ठिकाणी अशाच प्रकारे काही करता येऊ शकते का, यासंदर्भातील विचार सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.