जुईनगर स्थानक येथून खासगी प्रवासी वाहतूक
By Admin | Updated: August 18, 2014 01:40 IST2014-08-18T01:40:44+5:302014-08-18T01:40:44+5:30
जुईनगर रेल्वे स्थानकापासून मोठ्या प्रमाणात खाजगी प्रवासी वाहतूक होत आहे. उरण तसेच पनवेल मार्गावर ही खाजगी प्रवसी वाहतूक होत असल्याने एनएमएमटीला तोटा सहन करावा लागत आहे

जुईनगर स्थानक येथून खासगी प्रवासी वाहतूक
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकापासून मोठ्या प्रमाणात खाजगी प्रवासी वाहतूक होत आहे. उरण तसेच पनवेल मार्गावर ही खाजगी प्रवसी वाहतूक होत असल्याने एनएमएमटीला तोटा सहन करावा लागत आहे. परंतु उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
एखाद्या खेड्याप्रमाणे नवी मुंबईत देखील खाजगी वाहनाने प्रवाशी वाहतूक करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याकरीता जुईनगर रेल्वे स्थानकलगतची मोकळी जागा ही या खाजगी वाहनचालकांचे मुख्य स्थानक झाले आहे. या ठिकाणाहून जीप अथवा टॅक्सीने बेकायदा प्रवाशी वाहतूक केली जात आहे. ही प्रवासी वाहतूक उरण तसेच पनवेल मार्गावर होत आहे. सहा ते सात व्यक्तींची क्षमता असलेल्या या वाहनांमध्ये दहा ते बारा व्यक्तींना कसेबसे कोंबून हा जीवघेणा प्रवास होत आहे. गेल्या कित्तेक महिन्यांपासून त्या ठिकाणाहून ही खाजगी प्रवासी वाहतूक केली जात आहे. भरदिवसा ही खाजगी प्रवासी वाहतूक होत असतानाही उपप्रादेशिक परिवहन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या वडाप चालकांवर कारवाईचा बडगा उचलला जात नसल्याने दिवस रात्र त्यांचा हा व्यवसाय सुरु आहे. खाजगी वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक होत असल्याने अपघाताचे प्रकार राज्यात ठिकठिकाणी घडलेले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी वडापने प्रवासी वाहतुकीवर बंदी असताना नवी मुंबईत मात्र त्यांना रान मोकळे असल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा आर्थिक फटका एनएमएमटी प्रशासनाला सहन करावा लागत आहे. उरण आणि पनवेल मार्गावर एनएमएमटीच्या देखील बस धावत आहेत. परंतु या वडाप चालकांकडून अधिक प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जात असल्याने परिवहनच्या बससाठी प्रवाशीच मिळत नाहीत. त्यामुळे या मार्गावरील बस सुविधा बंद केली जाईल अशी शक्यताही निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)