Join us

रत्नागिरीच्या प्रिंटिंग प्रेसमधून सुरू होती बनावट नोटांची छपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 08:36 IST

अटकसत्रानंतर फेकून दिली मशीन, पतसंस्था कनेक्शनबाबत चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधूनच बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक केली. तसेच चिपळूण नागरिक पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक अमित कासार याने पतसंस्थेच्या माध्यमातून या नोटांचा वापर केला आहे का? याबाबतही गुन्हे शाखा तपास करत आहे.  

गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर (५०), राजेंद्र खेतले (४३), संदीप निवलकर (४०) आणि ऋषिकेश निवलकर (२६) यांना अटक केली होती. यांच्या चौकशीतून अमित कासारचे नाव समोर आले. 

राणेला अटक 

कासारच्या चौकशीतून एका वकिलालाही अटक केली आहे. त्यापाठोपाठ प्रसाद राणेला रत्नागिरीतून अटक केली. रत्नागिरीमध्ये राणेची प्रिंटिंग प्रेस आहे. तेथूनच तो बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. 

बनावट नोटा चलनात 

गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने बनावट नोटप्रकरणी अटकसत्र सुरू केल्यानंतर त्याने प्रिंटिंग मशीन घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाझुडपात फेकून दिली. गुन्हे शाखेने ही मशीन जप्त केली आहे. हुबेहूब वाटणाऱ्या नोटा मशीन तपासणाऱ्या मशीनमध्येसुद्धा ओळखल्या जात नव्हत्या. त्यामुळे आरोपींनी आतापर्यंत अनेक नोटा विविध बाजारात चलनात आणल्याचे समोर आले.

१० ते १५ हजारांचे कमिशन 

२५ हजारांच्या बनावट नोटांवर १० ते १५ हजारांचे कमिशन देत या नोटा चलनात आणल्या जात होत्या. यामध्ये कासार हा पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक असल्याने त्याला हाताशी घेत हे रॅकेट सुरू होते. कासारची ३१ जुलैला न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून काही उलाढाल केली आहे का? याबाबतही राणेकडे चौकशी सुरू आहे. त्याला ५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पूर परिस्थितीतही सुरू होता तपास 

गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सावंत, पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गणेश तोडकर, धनराज चौधरी, पोलिस अंमलदार चिकने आणि डफळे यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून चिपळूण, रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात सतत पूर परिस्थिती असतानाही मुंबई-रत्नागिरी-चिपळूण असा वारंवार प्रवास करून गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहे.

 

टॅग्स :धोकेबाजी